Mahashivratri 2020 : कोल्हापूरच्या प्राचीनतेचे साक्षीदार महादेव मंदिरांचे अस्तित्व आजही ठळक...

Mahadev Temple witnesses the antiquity of Kolhapur
Mahadev Temple witnesses the antiquity of Kolhapur

     वांगी बोळातून कपिलतीर्थ मंडईकडे जाताना आराध्ये यांचा वाडा लागतो. या वाड्याच्या मागे किमान दहा ते बारा फूट खाली एक माणूस कसाबसा जाऊ शकेल एवढीच चिंचोळी वाट आहे. ही वाट उतरून गेले की खाली एक मंदिर लागते. हे कर्दमेश्‍वर महादेवाचे मंदिर किती प्राचीन आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. याच रस्त्याने पुढे मुनिश्‍वर वाड्याच्या छोट्या बोळात वळले की वळणावळणाचा रस्ता थेट महादेव मंदिरासमोरच घेऊन जातो. जोशीरावांचे हे मंदिरही रस्त्यापासून खोलातच. या मंदिराजवळ दिंडे पाटलांच्या घराच्या मागे असाच जेमतेम एक माणूस खाली उतरेल एवढीच पायऱ्यांची वाट. चार-पाच पायऱ्या उतरले की पाणी आणि उजव्या हाताला भिंतीतच एक अरुंद वाट तेथेही शिवलिंग...पूर्वी चारुदत्त वाड्याची जेथे गाडी थांबत होती, त्याच्यामागे एक बोळ. या बोळाच्या टोकाला भवानी शंकर मंदिर. या मंदिरातील शिवलिंगही जमिनीपासून आठ-दहा फूट खोलातच. तेथेही पाणी. तेथे तर पाण्याच्या वरचेवर उपसा करण्यासाठी मंदिरातच एक मोटर (पंप) बसवली आहे. ही चार महादेव मंदिरे म्हणजे केवळ चार उदाहरणे. 

कपिलेश्‍वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत

आज जेथे कपिलतीर्थ मार्केट आहे ते पुर्वीचे कपिलतीर्थ तळे. या तळ्याच्या काठावर कपिलेश्‍वराचे मंदिर. कपिलेश्‍वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत. जो काही धार्मिक निर्णय घ्यायचा तो या कपिलेश्‍वराच्या साक्षीने एवढे त्याचे महत्व. पण कपिलतीर्थ तळे मुजवले. आता मंदिर आहे. पण त्याचे तत्कालिन महत्व नव्या पिढीला माहितच नाही. अशी परिस्थिती आहे. कपिलेश्‍वर खरोखर होता की नाही हे माहित नाही. पण कोल्हापूरचा इतिहास भुगोल शोधताना, अभ्यासताना ही मंदिरे अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कोल्हापूर परिसराला धार्मिक सांस्कृतिक प्राचिॆन परंपरा आहे. अनेक जुनी मंदिरे किंवा त्यांचे अवशेष बदलत्या काळाच्या ओघातही...

वांगी बोळातल्या आराध्येच्या वाड्यातील कर्दमेश्‍वराची रचना तर खूप वेगळी आहे. २०१९ च्या पावसाळ्यात पाच वेळा या मंदिरात जमिनीतून पाण्याचे उमाळे फुटुन पाणी आले. हेमंत आराध्ये व त्यांचे कुटुंबीय एक प्राचिन धार्मक ठेवा म्हणून मंदिर जपतात. त्याची माहिती इतरांना देतात. 
महाद्वार रोडला लागून जोतिबा रोड म्हणजे मोठ्या वर्दळीचा रोड. किंबहुना महाद्वार रोड इतकेच महत्त्व या रोडला आहे. या रोडवरून घाटी दरवाज्याकडे निघाले की आपल्याला पटणारही नाही उजव्या हाताला रस्त्याखाली दहा-बारा फुटावर महादेवाची मंदिरे आहेत. राधेशाम मंगल कार्यालय व माऊली लॉज परिसरात अशी रस्त्याखाली दोन प्राचीन महादेव मंदिरे आहेत. विशेष हे की त्यांची नित्य पूजा आहे.

उत्तरेश्‍वर पेठ हा जुन्या कोल्हापूरचा महत्वाचा भाग

याशिवाय खोल खंडोबा या नावातच हे मंदिर खोल जागेत असल्याचे स्पष्ट आहे. बुरूड गल्लीजवळ असलेले हे मंदिर कोल्हापूरकरांनी पहाणेच गरजेचे आहे. कारण जमिनीपासून २५ ते ३० फूट खाली खोलात शिवलिंग आहे. आत मंदिराचे दगडी खांब आहेत. कोल्हापूरचा सर्वांत जुना परिसर म्हणून खोलखंडोबा हा परिसर आहे. त्यामुळे तत्कालीन कोल्हापूरच्या प्राचीनत्वाचे अवशेष या मंदिराच्या माध्यमातून खुले आहेत.
याशिवाय गुजरी, भेंडे गल्ली (पेडणेकर), सोमेश्‍वर गल्ली, हत्तीमहाल रोड, सिद्धाळा सोमेश्‍वर, कपिलतीर्थ सांगावकर वाडा, मिणचेकर वाडा, जोशी वाडा देवहुतीश्‍वर, इंद्रेश्‍वर, सूर्येश्‍वर, रोहिडेश्‍वर, जासुद गल्ली, पद्माळा, टाऊन हॉल कुकुटेश्‍वर, सद्रेश्‍वर पंचगंगा, फलगुलेश्‍वर विल्सन पूल, लक्षतीर्थ, फुलेवाडी, रावणेश्‍वर शाहू स्टेडियम अशी महादेव मंदिरे आहेत. त्याचे धार्मिक महत्त्व ज्याच्या-त्याच्या श्रद्धेवर आहे. पण, ही जुन्या कोल्हापूरची रचना पेठापेठांत विभागली आहे. त्यापैकी उत्तरेश्‍वर पेठ हा जुन्या कोल्हापूरचा महत्वाचा भाग. या पेठेत महादेवाचे प्राचिन मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग जिल्ह्यातले सर्वांत मोठे शिवलिंग आहे. एका व्यक्तीच्या कवेत बसणार नाही एवढा मोठा त्या शिवलिंगाचा व्यास आहे. धार्मिकतेबरोबरच या मंदिराला व्यायाम व कुस्तीची परंपरा आहे. हे मंदिर व वाद्याची तालीम म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

एवढेच काय या मंदिराला भजन संगीताचाही परंपरा आहे. दर सोमवारी रात्री या मंदिरात भजन होते. भजन एवढे सुरेल की या भजनाला ठिकठिकाणी आंमत्रित केले जाते. न्यायमुर्ती गोविंद महादेव रानडे व या मंदिराचे नाते खूप वेगळे. ते या मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. हे मंदिर म्हणजे आता केवळ धार्मिक नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व क्रीडा घडामोडीचा केंद्रबिंदू उत्तरेश्‍वर महादेव आहे. शिवलिंग इतके मोठे व सुंदर आहे की कोल्हापूरकरांनी किंवा कोल्हापूरच्या नव्या पिढीने ते एकदा येऊन पहाणेच गरजेचे आहे.

जयंती व गोमतीचा संगम

जयंती व गोमती या कोल्हापूरातून वाहणाऱ्या एकेकाळच्या स्वच्छ खळाळत्या पाण्याच्या दोन नद्या. 
कात्यायनी, कळंबा, पाचगाव परिसरातून उगम पावणाऱ्या या नद्यात सांडपाणी मिसळत गेले व त्यांचे रूपांतर जयंती व गोमती नाल्यात झाले. जयंती व गोमती हे नाले नव्हते तर स्वच्छ पाण्याचे प्रवाह होते. याचे पुरावे त्यांच्या काठावर असलेल्या छोट्या छोट्या महादेव मंदिरावरून मिळतात. कारण मंदिरे कोणी सांडपाण्याच्या नाल्याच्या काठावर बांधत नाही. ते स्वच्छ पाण्याच्या काठावर बांधतात. जयंती व गोमतीचा संगम गोखले कॉलेजच्या पिछाडीस हुतात्मा पार्काजवळ होतो. बरोबर त्या ठिकाणी महादेव मंदिर आहे. पुढे शेळके पुलाजवळ महादेव मंदिर आहे. त्यापुढे विल्सन पुलावर फलगुलेश्‍वर महादेव मंदिर व जेथे जयंती पंचगंगेचा संगम आहे तेथेही महादेव मंदिर आहे.
लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, रावणेश्‍वर, वरूणतीर्थ, कुंभार तळे, कुकुटेश्‍वर (टाऊन हॉल), कपिलतीर्थ, रंकाळा, जयंती नदी अशा सर्व पाण्याच्या ठिकाणी महादेव मंदिरे आहेत. लक्षतीर्थ तलाव फुलेवाडीजवळ आहे. तोफेचा माळ असे पुर्वीचे नाव असलेल्या या माळावर अका बाजूला स्वच्छ पाण्याचे लक्षतीर्थ तळे आहे. या तळ्याच्या काठावर दगडी घाट व काठावर जुन्या वृक्षांच्या छायेत लक्षतीर्थ महादेव मंदिर आहे. 

रावणेश्‍वर महादेव

रावणेश्‍वर महादेव म्हणजे आताचे शाहू स्टेडियम. या स्टेडियमच्या मुळ जागेवर रावणेश्‍वर तलाव होता. पाण्याने तुडुंब भरलेला होता. तलावात मध्ये रावणेश्‍वर महादेवाला जायची वाट होती. तेथे छोटेखानी मंदिर होते. काळाच्या ओघात तलाव बुजवला गेला. रावणेश्‍वराचे मंदिर काठावर आणून पुन्हा बांधण्यात आले तलावाच्या जागी शाहू स्टेडियम उभे राहिले. आता फुटबॉल स्पर्धेच्या वेळी मैदान गर्दीने तुडुंब भरते. तर काठावर रावणेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची रांग 
लागलेली असते.

ऋणमुक्तेश्‍वर महादेव ​

कुंभार तळे म्‍हणजे गंगावेशीतले शाहू उद्यान. तळे बुजवून तेथे उद्यान तयार करण्यात आले. त्याच्यासमोरच ऋणमुक्तेश्‍वराचे मंदिर आहे. हा ऋणमुक्तेश्‍वर महादेव व त्याचे मंदिर म्हणजे कोल्हापुरातल्या असंख्य लग्नसमारंभाचा साक्षीदार. त्या काळात कोल्हापुरात मंगल कार्यालये, हॉलची सोय नव्हती. लग्न समारंभ दारात मांडव उभा करूनच करावे लागत होते. पण तेही अनेकांना परवडणारे नव्हते. त्यामुळे ऋणमुक्तेश्‍वर मंदिराचा हॉल सर्वांना अगदी अल्प शुल्क भरून किंवा केवळ एक नारळ पान सुपारी घेऊन लग्नासाठी उपलब्ध करून दिला होता. एकावेळी चार-चार पाच-पाच लग्न समारंभ तेथे होत होते. एक प्रकारे ते त्या काळातील सामुदायिक विवाह समारंभच होते. ऋणमुक्तेश्‍वर मंदिरात असे असंख्य विवाह ऋणमुक्तेश्‍वर महादेवाच्या साक्षीने झाले. 

कुकुटेश्‍वर महादेव

टाऊन हॉल म्हणजे कोल्हापूरचे निसर्ग वैभव. या उद्यानातले प्रत्येक झाड औषधी वनस्पतीचा गुणधर्म असणारे आहे. अशा झाडांच्या सावलीत या उद्यानात कुकुटेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागे पूर्व एक मोडी विहीर होती. या विहिरीला मोठा जिवंत झराही होता. त्यामुळे कुकुटेश्‍वर विहीर कायम भरलेली असायची. पण, निसर्गाने भरूभरून दिलेल्या या विहिरीत आज पूर्णपणे कचरा आहे. काठावर कुकुटेश्‍वराचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून दिल्याची कोनशिला मंदिरावर आहे. 

इंद्रेश्‍वर महादेव

महाद्वार रोडवरच कामत हॉटेलच्या शेजारी इंद्रेश्‍वर महादेव आहे. काळाच्या ओघात या मंदिरातले शिवलिंग वेगळ्या जागी ठेवले असावे. कारण एका टेलरिंगच्या दुकानातच हे शिवलिंग आहे. भेंडे गल्लीत पेडणेकर यांच्या घराच्या परड्यातच एक प्राचीन महादेव मंदिर आहे. आता भेंडे गल्ली म्हणजे सोन्या चांदीच्या मोठ्या आर्थिक उलाढालीची गल्ली आहे. पण, पूर्वी ही गल्ली कशी होती याची साक्षच हे मंदिर आजही देते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com