कर्नाटकातील 91 कोरोना रुग्णांचे महाराष्ट्र कनेक्शन...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

प्रशासन हादरले, मंडया जिल्ह्यात सर्वाधिक.

बेळगाव - कर्नाटकात मंगळवारी सापडलेल्या १२७ कोरोना रुग्णांपैकी तब्बल ९१ रुग्णांचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ माजली आहे. कर्नाटकाच्या मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या कोरोना बुलेटिननुसार १२७ रुग्ण सापडले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ६२ रुग्ण हे मंडया जिल्ह्यातील आहेत. त्या सर्वांचे कनेक्शन थेट मुंबईशी आहे. ग्रीन झोन मध्ये असलेल्या कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातही मंगळवारी कोरोनाची एन्ट्री झाली. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

गुलबर्गा येथे सापडलेल्या रुग्णांनाचे महाराष्ट्र कनेक्शन

चिकमंगळूर येथे दोन रुग्ण सापडले आहेत. आता कर्नाटकात ग्रीन झोन मध्ये केवळ एकच चामराजनगर हा जिल्हा राहिला आहे. उर्वरित सर्व जिल्हे आता कोरोनाग्रस्त झाले आहेत. कर्नाटकात एकाच दिवशी शंभरपेक्षा जास्त कोरोना रुग्ण प्रथमच सापडले आहेत. ही बाब चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश येथून आलेल्यांपैकी काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी ज्या ९१ रुग्णांचे महाराष्ट्र कनेक्शन पुढे आले आहे त्यातील ९० रुग्ण हे मुंबई येथून कर्नाटकात गेले आहेत. एक रुग्ण सोलापूर येथून गेला आहे. मंडयाप्रमाणे गुलबर्गा येथे सापडलेल्या रुग्णांनाचे महाराष्ट्र कनेक्शन आहे. मंगळवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण महाराष्ट्राचा सर्वाधिक धोका बेळगाव जिल्ह्याला असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

वाचा - 'ते' मुंबईतील रेड झोन मधून गावात आले, सोबत आणलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले अन् झाले गायब...

कर्नाटकात लॉक डाउन शिथिल करताना महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू व केरळ या राज्यातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण ही बंदी लागू होण्याआधीच महाराष्ट्र व अन्य तीन राज्यातून लोक मोठ्या संख्येने कर्नाटकात दाखल झाले आहेत. शिवाय मंगळवारपासून कर्नाटकात परिवहन मंडळाने बससेवा सुरू केली आहे. अपवाद वगळता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्याच दिवशी रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही मुंबई व पुणे येथील नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोना वाढू लागला आहे. पण कर्नाटकातही आता महाराष्ट्राची धास्ती निर्माण झाली हे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra connection of corona patients in Karnataka