esakal | बेळगावात पुन्हा कन्नड संघटनेची आगळीक ; मराठी फलकाला फासले काळे
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi panel is torn black in belgaum

प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर बेळगावातील मराठा समाजाशी संबंधित काही संघटनांनी विजयोत्सव साजरा केला

बेळगावात पुन्हा कन्नड संघटनेची आगळीक ; मराठी फलकाला फासले काळे

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला कन्नड भाषिकांनी काळे फासले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री येडीयुराप्पा, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र होते. मराठा विकास प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्या फलकाच्या माध्यमातून आमदार अभय पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले होते. या घटनेमुळे अनगोळ परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गळ्यात लाल व पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणांनी हे कृत्य केले आहे. त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते चित्रण समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. आमदार अभय पाटील यांच्या छायाचित्राला काळे फासण्याची सूचना चित्रण करणारा तरूण देत होता. अत्यंत वर्दळीच्या अशा या ठिकाणी हा प्रकार घडत असताना त्याला कोणी आक्षेप घेतला नाही हे विशेष. फलकाला काळे फासून ते तरूण आरामात तेथून निघून गेले. या घटनेमुळे बेळगाव शहरात पुन्हा भाषिक तणाव निर्माण झाला आहे. घटनेनंतर तो फलक तातडीने तेथून हटविण्यात आला आहे. 

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबर रोजी प्राधिकरणची स्थापना झाली तर 14 रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्यातील कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेला विरोध केला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. बेळगावात प्राधिकरण स्थापनेला थेट विरोध झालेला नाही. पण प्राधिकरण स्थापनेनंतर कन्नड संघटनांची धूसफूस सुरू आहे. कन्नड संघटनांच्या दबावानंतर कर्नाटक सरकराने प्राधिकरणचा निर्णय मागे घेवून मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तरीही कन्नड संघटनांचा विरोध कायम आहे.

प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर बेळगावातील मराठा समाजाशी संबंधित काही संघटनांनी विजयोत्सव साजरा केला. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. या प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याचे श्रेय शहराच्या दोन्ही आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. त्याबाबतचे संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. शिवाय शहरात विविध ठिकाणी अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले.

हे पण वाचा104 जोडप्यांनी घेतली स्वखर्चातून सप्तपदी 

आमदार अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाका येथे फलक लावला होता. त्याच फलकाला काळे फासण्यात आले आहे. पिरनवाडी येथे 14 ऑगस्ट रोजी संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यावरून भाषिक वाद सुरू झाला, तो वाद शमला असे वाटत असतानाच आता हा नवा वाद उद्भवला आहे. पोलिसांकडून यासंदर्भात अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे