शेतकरी नवरा नको गं बाई मला ? शेतकऱ्याच्या लग्नाची सोशल मिडीयावर चर्चा

दिलीप क्षीरसागर
Sunday, 27 December 2020

विवाहासाठी सजवलेल्या गाडी व लग्नाची चर्चा समाज माध्यमावर महाराष्ट्र व कर्नाटकात चांगलीच रंगली आहे.

कामेरी : मुलगा सरकारी नोकरीवाला हवा, शेतीपण पाहिजे. मात्र शेतकरी नको गं बाई मला ? अशी विवाहच्छुक मुलींची अपेक्षा आहे. पण महाराष्ट्रातील प्राजक्‍ता पाटील हिने कर्नाटकातील प्रयोगशील शेतकरी अमोल करडे-पाटील यांची जीवनसाथी म्हणून निवड करुन धाडसी निर्णय घेतला. त्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या विवाहासाठी सजवलेल्या गाडी व लग्नाची चर्चा समाज माध्यमावर महाराष्ट्र व कर्नाटकात चांगलीच रंगली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेले विवाह सोहळे सुरू झालेत. मुलगा -मुलगी बघा-बघीचा कार्यक्रम सुरू आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुलींची ‘नोकरदार मुलगा हवा’ अशी मागणी वाढतीच आहे. ‘शेतकरी नको पण मुलाला शेती हवी’ अशीही अपेक्षा वधुपक्षाची आहे. पण अशा स्थितीत चांगले शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील प्राजक्ता बाबासो पाटील -चंद्रे (महाराष्ट्र) हिने कर्नाटकातील कुन्नूरच्या अमोल बाळासो करडे-पाटील या त्यांच्याबरोबरीने शिकलेल्या पण नोकरी नसलेल्या प्रयोगशील शेतकरी असलेल्या तरुणाची जीवनसाथी म्हणून निवड केला.

हेही वाचा - विरोधक पुन्हा एकत्र ? राष्ट्रवादीत दोन गट झाल्याने नवे वळण -

त्यांनी शेतकरी पण काही कमी नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा विवाह कर्नाटकात मोठ्या थाटात झाला. विवाहासाठी वापरलेल्या सजवलेल्या चारचाकी गाडीची चर्चा समाज माध्यमावर जोरदार रंगली आहे. गाडीवर पुढील बाजूस बॉनेटवर शेतकरी अशी अक्षरे फुलांनी सजवली होती. टपावर शिवरायांची लहान मूर्ती, मागच्या बाजूला ‘लेक तुमची लक्ष्मी आमची’ असे लिहिले होते. शेतीत पिकलेल्या फुलापानांनी गाडी सजवली होती. 

"प्रत्येक मुलींची अपेक्षा डॉक्‍टर, इंजिनिअर, प्राध्यापक, मुलगा असावा अशी असते. मात्र आपल्या जन्मदात्याने कष्ट करून आयुष्यभर शेती संभाळली. त्याचा अभिमान बाळगळण्यासाठी व शेतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मी शेतकरी मुलाची निवड केली. त्याचा मला अभिमान आहे."

- प्राजक्ता पाटील

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage of one couple in sangli one photo of marriage at vural in sangli