
लग्न कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे.
बेळगाव (निपाणी) : कोरोनामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मास्क वापरले नाही तर कार्यालयच सील करण्याचा इशारा दिला होता. लग्न कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. विनापरवानगी सोहळा घेतल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील.
जानेवारी, फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला आवश्यक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लग्नकार्यासंदर्भात आदेश काढले असून हे आदेश एक डिसेंबरपासून लागू होतील. आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी बंदी कायम ठेवली आहे. लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादा आहे.
हेही वाचा - मतलई वाऱ्यांनी गणित बिघडवले अन् मासळीचे दर मात्र कडाडले -
संबंधितांना पालिका आणि पोलिसांची परवानगी लागेल. समारंभात सहभागी होणाऱ्याला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. सोहळ्यात विनामास्क आढळले तर मंगल कार्यालय चालकाला पहिल्यांदा पाचशे रुपयांचा दंड होईल. त्यानंतर असाच प्रकार घडला तर मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाईल. नंतर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
वाजंत्री नाहीच
विवाह सोहळ्यांना नियम व अटी घालून परवानगी दिली असली तरी फटाके आणि वाजंत्र्यांना अजूनही परवानगी नाही. त्यामुळे बहु गलबला न होताच शुभमंगल सावधान म्हणावे लागणार आहे.
"नियम व अटी पाळून विवाह सोहळ्यांना परवानगी मिळेल. पालिका आणि पोलिस प्रशासनाकडे संबंधित कुटुंब प्रमुखांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई होईल."
- प्रकाश गायकवाड, तहसीलदार, निपाणी
संपादन - स्नेहल कदम