
कोल्हापूर: जनसुविधा, नागरसुविधा आणि "क' वर्ग यात्रास्थळ निधीच्या यादीत अंशत: बदल झालाच कसा?, ही यादी बदलण्याचे अधिकार दिले कोणी?, असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करत सभागृह सोडण्याची तयारी केली. विरोधक आक्रमक असताना सत्ताधारी सदस्य सुस्त होते. त्यामुळे व्यासपीठावरील सदस्यांनाच खाणाखुणा, फोनाफोनी करुन सदस्यांना गलका करण्याच्या सुचना देण्याची वेळ आली. यानंतर सत्ताधारी सदस्यांनी मोठ्या आवाजाच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबत सर्वसाधारण सभा अक्षरक्ष: गुंडाळली.
सत्ता बदलानंतर नवीन सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेस उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सभापती हंबीरराव पाटील, डॉ.पदमाराणी पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासणे आदी उपस्थितीत होते.
विषय पत्रिकेचे वाचन झाल्यानंतर माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जनसुविधा, नागरी सुविधा यादीत काय बदल केले आणि का केले?, अशी विचारणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना केली. यावर भालेराव खुलासा करण्यासाठी उभे राहिले. यावेळी महाडिक यांनी भालेराव यांना अंशत: बदल म्हणजे काय ? अशी विचारणा करत बदल केलेल्या यादीचे वाचन करण्यास सांगितले. मात्र भालेराव हे बराच वेळ पानेच पलटत होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आणि विरोधक आक्रमक झाले.
अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, अनिता चौगले, सुनिता रेडेकर, प्रसाद खोबरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनीच सत्ताधारी सदस्यांना यादी मंजूर असल्याच्या घोषणा करण्यास प्रोत्साहन दिले.
कारवाईसाठी सभागृह एकवटले
भुदरगडच्या गट विकास अधिकारी माधुरी परीट यांनी पदाधिकाऱ्यांचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा वंदना जाधव यांनी देत सभागृहाचे कामकाज ठप्प केले. यावेळी सदस्या रोहिणी आबिटकर, प्रा.अनिता चौगले, रसिका पाटील, प्रियांका पाटील सर्वच महिला सदस्या आणि नंतर सर्वच सभागृहाने ही मागणी लावून धरली. परीट यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही, तसेच सक्तीच्या रजेवरही पाठवता येत नसल्याचे सीईओ मित्तल यांनी स्पष्ट केले. मात्र सभागृहच एकवटल्याने अध्यक्ष पाटील यांनी परीट यांना आजच रजेवर पाठवले जात असल्याचे जाहीर केले.
दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
सुरुवातीलाच समिती सदस्याच्या रिक्त पदाची निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी एकाच सदस्याला दोन फॉर्म भरण्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी विरोध केला. तर काही सदस्यांना दोन फॉर्म भरण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे दुजाभव केला जात असल्याचा आरोप सदस्य अरुण इंगवले यांनी करत दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. बराच वेळ हा वाद सुरु होता. मात्र श्री.अमन मित्तल यांनी प्रशासनाची बाजु योग्य असल्याचे सांगितले. मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने श्री.मित्तल यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.