गडहिंग्लजला नागरी सत्कारातून "महाविकास'चा तीर

अजित माद्याळे
Monday, 11 January 2021

गडहिंग्लज शहर विकासासाठी अकरा कोटींचा निधी दिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार झाला. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आयोजिलेल्या आणि कॉंग्रेस-शिवसेनेच्या सहभागाने झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीसाठी "महाविकास'चा तीर मारण्यात आला आहे.

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर विकासासाठी अकरा कोटींचा निधी दिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार झाला. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आयोजिलेल्या आणि कॉंग्रेस-शिवसेनेच्या सहभागाने झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीसाठी "महाविकास'चा तीर मारण्यात आला आहे. महाविकासचा झेंडा पालिकेवर फडकवण्याचा कार्यकर्त्यांनी जाहीररित्या केलेल्या निर्धारावर मुश्रीफांनी मौन पाळले. या मौनाचा अर्थ काढण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. 

मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांच्या गडहिंग्लजमधील जाहीर भूमिकेवर "शांत' राहणे पसंद केले. मुश्रीफ यांच्या मनाची ही "शांतता' समजावून घेणे इतके सोपेही नाही. तसेच इतक्‍या लवकर पालिका निवडणुकीवर भाष्य करणे हे एका राज्यस्तरीय नेत्याला शोभणारेही नाही, हे मुश्रीफ यांना ठाऊक आहे. भावना व्यक्त करणे कार्यकर्त्यांचे काम आहे. ते त्यांनी केलेच पाहिजे. परंतु त्यावर किती उतावीळ व्हायचे, हे नेत्यांनी ठरवायचे असते. हे मुश्रीफांना चांगले माहीत असल्यानेच त्यांनी केवळ "माझे चित्त तुमच्याकडे आहे, चिंता करू नका' इतकाच धीर देवून कार्यकर्त्यांतून आलेल्या निवडणुकीच्या भावनेला हात घालणे टाळले असावे. 

पालिका राजकारणात राष्ट्रवादी आणि जनता दल पारंपारिक विरोधक. गेल्यावेळी जनता दल विरोधात राष्ट्रवादीसह सेना-भाजपनेही स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविले. खरी लढत राष्ट्रवादी व जनता दलातच झाली. तत्पूर्वीच्या गोडसाखर कारखाना निवडणुकीत मुश्रीफ व जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे एकत्र आले. विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे पाठबळ मुश्रीफ यांनाच मिळाले. त्यानंतर हद्दवाढीची निवडणूक जनता दल व राष्ट्रवादीने एकत्रित लढविली.

उपनगराध्यक्ष निवडीत पुन्हा हे दोन्ही पक्ष पारंपारिक विरोधकाच्या भूमिकेत आले. तेंव्हापासून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचे वाढदिवसही जोराने होत आहेत. जेवणावळ्या उठत असल्याची चर्चा आहे. मुश्रीफ यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने "महाविकास'चा तीर मारण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्नसुद्धा या तयारीचाच एक भाग मानला जात आहे. त्यासाठी राज्याच्या धर्तीवर कॉंग्रेस व शिवसेनेला सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा या कार्यक्रमामुळे उघड झाला आहे. 

सारे मुश्रीफांच्या हाती... 
साखर कारखान्यातील पैरा, विधानसभेवेळी घेतलेली मदत, हद्दवाढीची एकत्रित लढविलेली निवडणूक या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मंत्री मुश्रीफ जनता दलासोबत तडजोड करणार की, कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून त्यांच्या विरोधात लढणार, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीत आहे. जनता दल सोबत जायचेच नाही, हा कार्यकर्त्यांचा चंग असला तरी नेते मुश्रीफ यांच्या निर्णयावरच सारे अवलंबून आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Mushrif Avoided Political Comment At The Event In Gadhinglaj Kolhapur Marathi News