चंदगडला मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलसाठी प्रयत्न करू, या राज्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

सुनील कोंडुसकर
Friday, 21 August 2020

राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंदगड तालुक्‍यात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे.

चंदगड : दूर्गम भागातील जनतेचे प्रश्‍न सुटले पाहिजेत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास प्रयत्न आहेत. राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंदगड तालुक्‍यात आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. इथल्या ट्रामा केअर सेंटरला जागेसाठी निधीची उपलब्धता त्वरीत केली जाईल. मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलसाठीही प्रयत्न करू, असे आश्‍वासन आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. 

येथील आरोग्य विभाग, महसूल प्रशासनातर्फे आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार राजेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुक्‍यातील प्रश्‍नांची मंत्रीमंडळातील सदस्यांना माहिती व्हावी या उद्देशाने राज्यमंत्री यड्रावकर यांना निमंत्रीत केले. हलकर्णी औद्योगिक वसाहतीत ट्रामा केअर सेंटरसाठी चार एकर जागा उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी 41 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. त्याशिवाय मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल ही या भागाची गरज आहे. आरोग्य विभागाकडे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याकडे लक्ष वेधले.

वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसान विचारात घेता बाजारभावाने नुकसान भरपाई देणे आणि हत्तींसाठी तिलारीच्या घाटाखाली अभयारण्य करण्याची मागणी केली. याबाबत यड्रावकर यांनी स्पष्टीकरण दिले. मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे भरती प्रक्रीया थांबली आहे. परंतु जिल्हा स्तरावर समितीतर्फे आवश्‍यक जागा भरून घेतल्या जात आहेत. या विभागासाठी रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील रुग्णांना बेळगाव शहर जवळचे आहे. परंतु बेळगाव शहर कर्नाटकात असल्याने राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यासाठी खास प्रयत्न करुन केएलई रुग्णालयात या योजनेचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले. राजगोळी बुद्रूक, कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती पूर्णत्वाकडे आल्या असून लवकरच त्या कार्यान्वित करणार असल्याचेही सांगितले. 

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी कोरोना संदर्भात आढावा घेतला. प्रशासनाच्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने यांचा सत्कार झाला. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, भरमाणा गावडे, शिवानंद हुंबरवाडी, नितीन पाटील, प्रवीण वाटंगी, पांडुरंग बेनके यांनी प्रश्‍न मांडले. जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, सभापती ऍड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणगेकर, नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, दयानंद काणेकर, राजेंद्र परीट, अभिजित गुरबे, बाळासाहेब हळदणकर, संज्योती मळवीकर, शांता जाधव उपस्थित होते. तहसिलदार विनोद रणावरे यांनी आभार मानले. राजगोळे यांनी सूत्रसंचालन केले. 

पाच व्हेंटीलेटर देणार.... 
चंदगड अर्बन बॅंक, रवळनाथ पतसंस्था व वेणुगोपाल पतसंस्थेतर्फे कोवीड सेंटरसाठी पाच व्हेंटीलेटर देणार असल्याचे प्रवीण वाटंगी यांनी जाहीर केले. 

आयसीयु सेंटर सुरु करणार
चंदगड येथे आरोग्याच्या सुविधांसाठी खासदार निधीतून 1 कोटी रुपये दिले आहेत. त्याशिवाय दहा बेडचे अत्याधुनिक आयसीयु सेंटर सुरु करणार आहे. 
- संजय मंडलीक, खासदार 

 

संपादक - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Minister Of State Said, We Will Try For A Multispeciality Hospital In Chandgad Kolhapur Marathi News