
नेत्यावरील प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी केला असा त्याग आणि त्याचे मिळाले असे फळ
सांगली :कार्यकर्त्यांचे नेत्यावर असणारे निस्सीम प्रेम आणि नेत्यांकडून अशा कार्यकर्त्यांचा होणारा सन्मानपूर्वक आदर याचा अनोखा संगम आज पहावयास मिळाला. जोपर्यंत गोपीचंद पडळकर आमदार होणार नाहीत तो पर्यंत चप्पल घालणार नाही असा पण केलेल्या दोन कार्यकर्त्यांना आज चांदीचे चप्पल आणि दुचाकी गाडी प्रदान करण्यात आली. तर एका कार्यकर्त्याच्या वारसांना दुचाकी गाडी देण्यात आली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे या गावी झालेल्या या भावपूर्ण सोहळ्यात कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील दृढ नाते पहावयास मिळाले.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी लढणारे गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांच्या मध्ये एक वेगळी भावना आहे. धनगर समाजाच्या कोणत्याही प्रश्नावर गोपीचंद पडळकर हेच आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून बहुजन वंचित आघाडी मार्फत निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या वतीने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र या ठिकाणीही त्यांचा मोठा पराभव झाला होता.
त्याच दिवशी चप्पल घालणार
आपला नेता आमदार झालाच पाहिजे अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची होती. दत्तात्रय कटरी यांनी 2006 पासून पायात चप्पल घातले नव्हते तर नारायण पुजारी यांनी 2009 पासून चप्पल घालण्याचे बंद केले होते. ज्या दिवशी गोपीचंद पडळकर आमदार होतील तेव्हाच आपण चप्पल घालणार असा पण त्यांनी केला होता .
अशीही भेट
या दोघांना चांदीचे चप्पल आणि दुचाकी गाडी प्रदान करण्यात आले. जालिंदर क्षीरसागर यांनी 2009 पासून मध्ये जोपर्यंत पडळकर आमदार होणार नाही तोपर्यंत आपण केस आणि दाढी चे पैसे ग्राहकाकडून घेणार नाही असा निर्धार केला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना गाडी प्रदान करण्यात आली. या भावपूर्ण कार्यक्रमास श्री पडळकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना चप्पल व गाडी प्रदान करण्यात आले.
भावपूर्ण कार्यक्रम
या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांचे भाषण सुरू असताना गोपीचंद पडळकर यांना अश्रू आवरता आले नाहीत. पडळकर यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांचे पाय धून त्यांच्या पायात चांदीची चप्पल घातले.
संपादन-अर्चना बनगे