‘अरे बघतोस काय, मार त्याला’ म्हणत आमदार सदाभाऊ खोत यांच्या वाहनचालकावर गुंडानी केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

वाघवाडीजवळ गाडी अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

इस्लामपूर (सांगली) : गाडी अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नामांकित गुंड शकील गोलंदाज व त्याचा साथीदार सुहेल मुल्ला या दोघांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी दुपारी ( १५) ही घटना घडली. माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांच्या खासगी वाहनावर चालक असलेल्या अनिल पवार (वय २६, कुरळप) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोलंदाजला पोलिसांनी अटक केली आहे. साथीदार सोहेल मुल्ला पसार आहे. गोलंदाजला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

पोलिसांनी माहिती दिली, की

श्री. पवार आमदार सदाभाऊ खोत यांचे खासगी वाहन (एम. एच १० डी एल १०१५) वर चालक आहेत. शनिवारी दुपारी ३.१५ वाजता ते व स्वप्नील सुर्यवंशी असे पेट्रोल भरण्यासाठी वाघवाडी रस्त्याला प्रतिक पेट्रोल पंपावर निघाले होते. चव्हाण कॉर्नरवरून वाघवाडी रोडला वळले असता समोरून एक चार चाकी (एम एच ४३ ए ई ०००७) वरील चालकाने क्रॉस मारून आडवले. चालक सीटवर बसलेला इस्लामपूर येथील गुंड शकील गोलंदाज व त्याचा साथीदार सुहेल मुल्ला होते. त्यांनी पवार यांना ‘तू माझ्या गाडीच्या आडवी गाडी मारतोस काय?’ असे म्हणून शिवीगाळ सुरूवात केली. पवार गाडीतून खाली उतरताच शकीलचा मित्र सुहेलने ‘अरे बघतोस काय, मार त्याला’ असे म्हणू लागला.

हेही वाचा- कंत्राटी तत्वावर मनुष्यबळासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करा -

गोलंदाजने ‘तुला ठेवत नाही, तुला आता संपवतोच’ असे म्हणून चाकू काढून पवारच्या पोटात मारत असताना गोलंदाजला जोरात धक्का मारून बाजूला ढकलून पवार गाडीत बसले. आजूबाजूचे लोक जमले असता शकीलने चाकू दाखवत लोकांकडे पाहत ‘कोणी पुढे आले तर, एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. जमलेले लोक पळून गेले. नंतर पवार यांनी मित्र अभिषेक भांबूरेला बोलावून घेऊन प्रकार सांगितला. 
इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोलंदाजला पोलिसांनी रात्रीच अटक केली. आज न्यायालयात हजर करण्यात आले. 

हेही वाचा- राजकारणात प्रत्येकाला आपण आर. आर. व्हावे असे वाटतं ! -

 

गोलंदाज, सराईत गुन्हेगार
शकील गोलंदाज सराईत गुन्हेगार आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी-मारामारी, दरोडा, जुगार, किरकोळ मारामारी या प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sadabhau Khot Hooligan attack on driver Attempt to kill by stopping a vehicle near Waghwadi