मोबाईल चोर आता विद्येच्या प्रांगणात

The Mobile Thief Is Now In The School Kolhapur Marathi News
The Mobile Thief Is Now In The School Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शहरात आठवडा बाजारादिवशीच मोबाईल चोरीला जातात, हा अनुभव आतापर्यंतचा होता. परंतु बारावी परीक्षेची संधीही या चोरट्यांनी सोडलेली नाही. हे मोबाईल चोरटे आता विद्येच्या प्रांगणात पोहचले आहेत. बारावी परीक्षेच्या आज पहिल्याच दिवशी परीक्षार्थींनी बाहेर ठेवलेल्या सॅकमधील चार ते पाच मोबाईल हॅण्डसेट चोरीला गेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेबरोबरच आपल्या मोबाईल चोरीचे "टेन्शन' आले आहे. 

आठवडा बाजार एवढेच नव्हे तर हे चोरटे विद्येच्या प्रांगणातही पोहचल्याचे आज समोर आले. कडगाव रोडवरील साधना महाविद्यालयात बारावी परीक्षेची आसन व्यवस्था आहे. यावर्षी परीक्षा मंडळाने कॉपी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. परीक्षार्थींना सॅक, बूट, चप्पल, मोबाईल, बेल्ट आदी साहित्य परीक्षा हॉलपर्यंत नेण्यास बंदी घातली आहे. प्रवेशद्वाराबाहेरच हे साहित्य ठेवण्याची सक्त ताकीद दिली आहे. यामुळे परीक्षार्थी वरील साहित्य या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठेवून पहिला पेपर सोडवण्यात मग्न असताना काही भुरट्या चोरट्यांनी बॅगमधील मोबाईल हॅण्डसेट चोरून नेल्याची घटना घडली. 

परीक्षा संपल्यानंतर बॅगेची तपासणी करताना परीक्षार्थींच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर पोलिसात तक्रार झाली. पोलिस घटनास्थळी जावूनही आले. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये मोटरसायकलवरून जाणारा एकजण कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचे फुटेज आणले असले तरी त्याला शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

रखवाली कोण करणार ? 
परीक्षार्थी परीक्षेला येताना साहित्य आणतात. कॉपीला आळा घालण्यासाठी साहित्य बाहेर ठेवावे हे मान्य आहे. मुळात मोबाईल आणू नयेत अशी सूचना असूनही काही परीक्षार्थी मोबाईल आणतात. ही त्यांची चूक ग्राह्य धरली तरी इतर साहित्याची रखवाली कोण करणार, हा मुद्दा तसाच राहतो. परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर पोलिसांची नेमणूक असते. मग चोरट्यांचे धाडस होतेच कसे, हा प्रश्‍न आहे. यामुळे बंदोबस्तासाठी असणारे पोलिस किंवा शाळेचा एखाद्या शिपायाकडून या साहित्यावर लक्ष ठेवण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com