जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक पिग्मी कर्मचाऱ्यांची ससेहोलपट

दीपक कुपन्नावर
Wednesday, 30 September 2020

रोजच्या गोळा होणाऱ्या पैश्‍यावरच त्यांचे जीवणगाणे सुरू असते. पंरतु, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून विस्कळीत झालेली व्यवहाराची घडी अद्याप बसू शकलेली नाही.

गडहिंग्लज : रोजच्या गोळा होणाऱ्या पैश्‍यावरच त्यांचे जीवणगाणे सुरू असते. पंरतु, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून विस्कळीत झालेली व्यवहाराची घडी अद्याप बसू शकलेली नाही. साहजिकच बाजार पेठेतील उलाढाल मंदावल्याने त्याचा फटका पिग्मी कर्मचाऱ्यांना बसतो आहे. पुर्वीचे उत्पन्न आता निम्यावर आले आहे. परिणामी, जिल्हयातील सुमारे दहा हजाराहून अधिक पिग्मी कर्मचांऱ्याची ससेहोलपट सुरुच आहे. 

व्यापारी, विक्रेते यांना कर्जाचे पैसे भरण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी पिग्मीची खऱ्याअर्थाने सुरवात झाली. कमाईतून रोज थोडी रक्कम भरू लागल्याने हळुहळू कर्जाचा डोंगरही कमी होऊ लागल्याने याला व्याविसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. रोजच्या कमाईतील थोडी रक्कम बचत म्हणून भरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. पतसंस्था, सहकारी बॅकांनीही याला व्यवसायाच्या वाढीसाठी मोलाच्या असणाऱ्या या संकल्पनेला पाठबळ दिले. साहजिकच पिग्मी कर्मचारी म्हणुन अनेकांना रोजगार मिळाला. अलिकडे अर्धवेळ कामातुनही चांगले मानधन मिळू लागल्याने पिग्मी कर्मचारी म्हणुन महिलांची संख्याही वाढली आहे. 

मार्च मध्यापासुन कोरोनाचे दुष्टचक्र सुरू झाले. जवळजवळ अडीच महिने कडक लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. याकाळात पिग्मी पुर्णपणे बंद राहिली. त्यानंतर अर्थचक्र सुरळीत व्हावे यासाठी "अनलॉक' मधुन नियम, अटींचे पालन करत काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली. तेव्हांपासून पिग्मी सुरू झाली. व्यवहार सुरु झाले तरी उलाढाल जेमतेमच राहिली. यामुळे रोजचा गल्लाच कमी असल्याने दैनदिन खर्च भागवुन पिग्मी भरणे अनेकांना अडचणीचे झाले. त्याचा थेट परिणाम पिग्मी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर झाला. पुर्वीच्या तुलनेत ओढाताण करत कसेबसे पन्नास टक्के रक्कम जमा होते. 

सुरवातीला कोरोनाची मुंबईला परिस्थिती गंभीर होती. अनलॉक झाल्यानंतर चाकरमनी ग्रामीण भागात परतू लागल्याने संर्सग वाढू नये यासाठी पुन्हा लॉकडाउन सुरू झाले. या सर्वांचा परिपाक म्हणजे बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होऊ शकलेले नाहीत. त्यातच पुर्वी संध्याकाळी सातला बंद होणारे व्यवहार आता पाचला थांबवावे लागतात. मुख्यतः सायंकाळी नंतरच पिग्मी अधिक गोळा होते. या बदलेल्या वेळामुळेही तुटपुंज्या उत्पन्नावरही टाच येत आहे. 

रोजचे कलेक्‍शन जेमतेम
व्यापारी, विक्रेत्यांचे व्यवहार सुरळीत नसल्याने रोजचे कलेक्‍शन जेमतेम आहे. त्यामुळे सध्या पिग्मी गोळा करुन कुटुंब चालविणे खडतर बनले आहे. त्यातच रोजचे व्यवहार बंद होण्याच्या वेळा बदलत असल्याने त्याचाही परिणाम होतो आहे. 
- अमित शेणवीकर, पिग्मी कर्मचारी, गडहिंग्लज 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More Than Ten Thousand Pygmy Employees In Trouble In The Kolhapur District Kolhapur Marathi News