
गडहिंग्लज : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मार्चच्या मध्यापासून हीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बहुतांश शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय कितीही चांगला असला तरी त्याची दुसरी बाजूही तितकीच धोक्याची बनत चालली आहे. ऑनलाईन शिक्षणाआड "पब्जी'सह इतर ऑनलाईन गेमच्या विळख्यात विद्यार्थी अडकत चालला असून पालकांनी वेळीच लक्ष नाही दिले, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शैक्षणिक संस्था बंद असण्याचा हा चौथा महिना. गेल्या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावी वगळता सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या. यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू झाले आहे. खासगीसह सरकारी शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्याची धडपड सुरू केली आहे. त्यातच या शैक्षणिक वर्षाचे कामकाज ऑनलाईन राबवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी-पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
हातावरचे पोट असलेल्यांनीही केवळ पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने मोबाईलची खरेदी केल्याचे चित्र आहे. बहुतांश शाळा-महाविद्यालयांमधून ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. अर्धा-एक तासाचा अभ्यास असतो. परंतु, ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली पाल्याकडे दिवस-रात्र मोबाईल असतो. अभ्यासाचा कालावधी वगळून त्या मोबाईलचा वापर कशासाठी होतो, याकडे सर्वच पालक लक्ष देतात असे नाही.
पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याच्या आयुष्यात धोक्याची घंटा वाजायला सुरूवात होण्याचा धोका आहे. ऑनलाईन शिक्षण आणि अभ्यास संपल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थी ऍन्ड्राईड मोबाईलवर पब्जी आणि ऑनलाईनच्या विविध गेममध्ये अडकण्याचे प्रकार वाढत आहेत. कट्ट्यावर ग्रुपने बसून हे विद्यार्थी या खेळात गुंतत असून हे चित्र धोक्याचे आहे. पालकांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी नेट पॅक मारून घ्यायचा आणि अभ्यास कमी व गेम जास्त असे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत मोबाईल नसलेल्या पाल्यांकडे कोरोनाच्या बंदमुळे हातात नवीन मोबाईल आल्याने त्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. इंटरनेटवरील सर्फिंग वाढले आहे.
ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ पाल्याच्यादृष्टीने घातक असल्याने पालकांनी वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पब्जीमुळे अनेक तरुणांचे जीव धोक्यात आलेत. काहींनी आत्महत्यासुद्धा केल्या आहेत. शाळा-महाविद्यालय सुरू असल्यास मुले शाळेत गुंतलेले असतात. यामुळे मोबाईलचा फारसा संपर्क येत नाही. परंतु, आता शाळाच सुटी असल्याने सातत्याने हातात मोबाईल खेळत आहे. एकीकडे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईनचा पर्याय शोधला असताना दुसऱ्या बाजूला गेममध्ये अडकणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे बाहेर काढायचे, हा मोठा यक्ष प्रश्न भविष्यात पालकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे.
पालकांनी हे करावे...
- शिक्षण, अभ्यासापुरते पाल्याकडे मोबाईल द्या
- अभ्यासानंतर मोबाईलपासून पाल्याला लांब ठेवा
- विविध खेळांमध्ये पाल्याला गुंतवा
- पाल्यांच्या मोबाईलवरील सर्फिंगवर लक्ष ठेवा
- गेमच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करा
- "पब्जी' गेमचे धोके समजावून सांगा
- विशेष करून महाविद्यालयीन पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक
- इतर वेळेत पाल्यांच्या हालचालीवर नजर ठेवा
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.