esakal | इचलकरंजीत वीस हजार कुशल कामगारांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Needs Twenty Thousand Skilled Workers In Ichalkaranji Kolhapur Marathi News

महाराष्ट्राची मॅंचेस्टरनगरी म्हणून लौकीक असलेल्या शहर आणि परिसरातील वस्त्रोद्योग व्यवसायाला तब्बल 20 हजार कुशल कामगारांची गरज आहे.

इचलकरंजीत वीस हजार कुशल कामगारांची गरज

sakal_logo
By
संजय खूळ

इचलकरंजी : महाराष्ट्राची मॅंचेस्टरनगरी म्हणून लौकीक असलेल्या शहर आणि परिसरातील वस्त्रोद्योग व्यवसायाला तब्बल 20 हजार कुशल कामगारांची गरज आहे. लॉकडाउननंतर अनेक परप्रांतीय कामगार आपल्या गावी गेले असून त्यामुळे त्यांच्या जागी अशा कामगारांची उणीव या उद्योगाला भासत आहे. असे कुशल कामगार तयार करण्यासाठी आता शहरानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. येथील डीकेटीई या वस्त्रोद्योगाचे शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अशा कुशल कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात येत आहे. 

कशामुळे कमतरता? 
शहरात वस्त्रोद्योगाशी संबंधित सायझिंग, प्रोसेस, यंत्रमाग, स्वयंचलित यंत्रमाग, गारमेंट असे विविध उद्योग आहेत. याशिवाय या उद्योगाला पूरक अशा अन्य उद्योगांचाही समावेश आहे. विशेषत: सायझिंग, प्रोसेस आणि आधुनिक यंत्रमागावर उत्तरप्रदेश, बिहार या ठिकाणचे कामगार मोठ्या प्रमाणात काम करीत होते. हे कामगार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावी परतले आहेत. त्यामुळे साध्या यंत्रमागासह आधुनिक यंत्रमागापर्यंतच्या सर्व उद्योगांत कामगारांची उणीव भासणार आहे. 

कोणत्या उद्योगात संधी 
शहराबरोबरच हातकणंगले तालुक्‍यातील लक्ष्मी औद्योगिक वसाहत, शिरोळ तालुक्‍यातील पार्वती औद्योगिक वसाहत व अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग व्यवसाय विस्तारला आहे. प्रामुख्याने साध्या यंत्रमागात मागवाला हा घटक कमी पडत आहे. त्याचबरोबर रॅपिअर व एअरजेट लूममध्ये काम करणारे कामगार यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. या सर्व ठिकाणी थोड्याशा तांत्रिक शिक्षणानंतर युवक कुशल कामगार बनू शकणार आहेत. 

डीकेटीई देणार प्रशिक्षण 
देशात वस्त्रोद्योग शिक्षणात व संशोधनात आघाडीवर असलेल्या डीकेटीई संस्थेने देश आणि विदेशातील अनेक कुशल तंत्रज्ञानांना प्रशिक्षण देण्याचे काम यापूर्वी केले आहे. जगातील विविध देशांनी त्याचबरोबर मणिपूरसारख्या राज्याने येथे तंत्रज्ञानांना प्रशिक्षणासाठी पाठवले होते. आता शहर आणि परिसरातील कुशल कामगारांची उणीव लक्षात घेऊन डीकेटीईने यासाठी खास प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला आहे. सध्या सुमारे 500 हून अधिक जणांनी प्रशिक्षणासाठी अर्ज केला आहे. 

स्थानिकांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार
वस्त्रोद्योग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात रोजगाराभिमुख आहे. आता परिसरातील युवक आणि महिलांना कुशल कामगार बनण्याची संधी आहे. असे कुशल तंत्रज्ञ डीकेटीईच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतील व स्थानिकांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. 
-आमदार प्रकाश आवाडे, 
माजी वस्त्रोद्योगमंत्री. 

दृष्टिक्षेपात वस्त्रोद्योग 
* शहर आणि परिसरातील यंत्रमाग- 1 लाख 10 हजार 
* अत्याधुनिक यंत्रमाग - 25 हजार 
* सायझिंग उद्योग- 180 
* प्रोसेस उद्योग- 65 
* सहकारी व खासगी सूतगिरण्या -8.