निर्भया'कडून टवाळखोरांना कारवाईची गिफ्ट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : हुल्लडबाजी करून "व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्या 53 टवाळखोरांना निर्भया पथकाने कारवाईची गिफ्ट दिली. दिवसभर शहरातील महाविद्यालये, शाळा, रंकाळा चौपाटी, राजाराम तलाव परिसरात ही मोहीम सुरू होती. 

कोल्हापूर : हुल्लडबाजी करून "व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्या 53 टवाळखोरांना निर्भया पथकाने कारवाईची गिफ्ट दिली. दिवसभर शहरातील महाविद्यालये, शाळा, रंकाळा चौपाटी, राजाराम तलाव परिसरात ही मोहीम सुरू होती. 

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी छेडछाडीचा त्रास कसा सहन करतात? घरचा दबाव, पुढील शिक्षण बंद होईल, गुंडांच्या नादी कशाला लागायचे, म्हणून तक्रारी देत नाहीत, हे महाविद्यालयातील सुमारे चारशे विद्यार्थ्यांशी संवाद साधून "सकाळ'ने केलेल्या "दामिनी व्हा' या रिपोर्ताजमधून मांडले होते. तक्रारीअभावी कारवाई करण्यात निर्भया पथकालाही मर्यादा येत होत्या; पण आज महिला, तरुणी तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ लागल्याने निर्भयाच्या कारवाईला आणखी बळ प्राप्त होत आहे. निर्भयाच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांवर कारवाईचा धडाकाच लावला आहे. "व्हॅलेंटाईन डे' निमित्त आज सकाळपासून उपनिरीक्षक अनित मेणकर व त्यांच्या पथकाने शहरातील शाळा, महाविद्यालये परिसरासह राजाराम तलाव, रंकाळा चौपाटी येथे कारवाई केली. 

नागाळा पार्क, न्यू महाद्वार रोड, राजारामपुरी, गांधी मैदान, खासबाग आदी परिसरातील शाळा, महाविद्यालयांबाहेर पथकाने सापळा रचून कारवाई केली. घोळका करून उभे असलेले, मोटारसायकलवरून घिरट्या घालणाऱ्या रोडरोमिओंना त्यांनी पकडण्यास सुरवात केली. पोलिसांना पाहून अनेकांनी आपली वाहने तेथेच सोडून पळ काढला. कारवाईत पोलिसांच्या हाती 20 अल्पवयीन लागले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. एका अल्पवयीन मोटारसायकलस्वाराच्या पालकांवर कारवाई करण्यात आली. इतर पकडलेल्या 28 जणांपैकी पाचच जणांवर खटले दाखल केले. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोहिमेत कर्मचारी सविता पाटील, कोमल पाटील, सूरज भोसले, अविनाश तारळेकर, चालक किशोर पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya's gift of action to the roadromeos