गडहिंग्लजला पहिलाच जनता दरबार निरंक! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

लोकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी येथील पंचायत समितीत आज जनता दरबार झाला. मात्र, जनतेच्या या दरबारात एकही तक्रार आली नाही. त्यामुळे पहिलाच जनता दरबार निरंक ठरला. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) जनता दरबार वाया जाऊ न देता यापूर्वी आलेल्या जुन्या तक्रार अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. दरम्यान, गडहिंग्लज पंचायत समितीकडे नव्याने सुरू केलेल्या जनता दरबाराची लोकांनाच फारशी नसल्याचे समोर आले. त्यामुळे जनता दरबाराबाबत गावपातळीवर जगजागृती होणे आवश्‍यक आहे. 

गडहिंग्लज : लोकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी येथील पंचायत समितीत आज जनता दरबार झाला. मात्र, जनतेच्या या दरबारात एकही तक्रार आली नाही. त्यामुळे पहिलाच जनता दरबार निरंक ठरला. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) जनता दरबार वाया जाऊ न देता यापूर्वी आलेल्या जुन्या तक्रार अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. दरम्यान, पंचायत समितीकडे नव्याने सुरू केलेल्या जनता दरबाराची लोकांनाच फारशी नसल्याचे समोर आले. त्यामुळे जनता दरबाराबाबत गावपातळीवर जगजागृती होणे आवश्‍यक आहे. 

ग्रामविकास विभागाने पंचायत समिती स्तरावर जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्यातील पहिल्या शुक्रवारी जनता दरबार घेण्याचे निश्‍चित केले आहे. आज पहिलाच जनता दरबार होता. गटविकास अधिकारी शरद मगर अध्यक्षस्थानी होते. सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पण, प्रतीक्षा होती ती तक्रारदारांचीच. आज एकही तक्रारदार जनता दरबारात आला नाही. त्यामुळे जनता दरबार तक्रारीविना निरंक राहिला. जनता दरबाराबाबत ग्रामस्थांना पुरेशी माहिती नसल्यामुळेच एकही तक्रारदार आला नसल्याचे दिसून आले. 

दरम्यान, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी यापूर्वी आलेल्या जुन्या तक्रारींचा आढावा घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून कोणत्या तक्रारींची निर्गत झाली, कोणत्या तक्रारी प्रलंबित आहेत याची माहिती घेतली. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक तक्रारींची निर्गत झाली आहे. मात्र, त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीला दिला नसल्याचे आढाव्यात स्पष्ट झाले. अहवाल तातडीने देण्याची सूचना श्री. मगर यांनी केली. 

सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्‍वर, कृषी अधिकारी दिनेश शेटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी, बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. एस. जाधव, विस्तार अधिकारी घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. विस्तार अधिकारी किरण खटावकर यांनी आभार मानले. 

कार्यक्षेत्राबाहेरील तक्रार... 
पंचायत समितीत आज झालेल्या जनता दरबारात एकमेव तक्रारदार उपस्थित होते. मात्र, तेही पंचायत समितीच्या ेकार्यक्षेत्राबाहेरील होते. तक्रारदारांनी आपली तक्रार मांडली. पण, हा विषय पंचायत समितीच्या अखत्यारित येत नसल्याने तक्रारीची सोडवणूक करणे अडचणीचे ठरले. त्यांची तोंडी तक्रार ऐकून घेण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No One Complaints In Gadhinglaj Janta Darbar Kolhapur Marathi News