esakal | गडहिंग्लजचे व्यापारी यापुढे दुपारपर्यंतच पाळणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Now Gadhinglaj Traders Will The Closure Till Only Noon Kolhapur Marathi News

प्रत्येक कारणासाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच टार्गेट होत असून मोठे आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. 

गडहिंग्लजचे व्यापारी यापुढे दुपारपर्यंतच पाळणार बंद

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोणत्याही कारणाने राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून पुकारण्यात येणाऱ्या बंदला यापुढे शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारी बारापर्यंतच व्यवहार बंद ठेवून संयोजकांना सहकार्य करण्याचा धाडसी निर्णय येथील चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे. प्रत्येक कारणासाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच टार्गेट होत असून मोठे आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. 

विविध सामाजिकसह इतर कारणांसाठी बंदचे आवाहन केले जाते. यासाठी विविध राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था, संघटनांकडून अशा बंदचे आवाहन केले जाते. परंतु, हा बंद केवळ व्यापाऱ्यांसाठी का असा प्रश्‍न नेहमी व्यापाऱ्यांतून उपस्थित होत असतो. बंद केले नाही म्हणून फोडाफोडीचे प्रकारही घडतात. गडहिंग्लजमध्ये असे प्रकार कधी घडले नसले तरी याचे नुकसानही व्यापाऱ्यांनाच सहन करावा लागतो. सहकारी संस्था, शासकीय कार्यालयांसह इतर काही अस्थापना सुरू असतात. केवळ व्यापाऱ्यांनाच टार्गेट करुन बंद करण्यास भाग पाडले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर नुकताच कोरोना लॉकडाऊन झाला आहे. व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. याशिवाय वारंवारच्या बंदमुळेही आर्थिक नुकसान होते. कर्जे काढून व्यवसाय चालवायचे आणि कोणासाठी तरी दुकाने बंद ठेवायची, हे किती दिवस चालणार असा व्यापाऱ्यांचा प्रश्‍न आहे. कधी-कधी अचानकही बंद पुकारला जातो. बंद केले नाही म्हणून व्यापाऱ्यांवर वैयक्तिक आरोपही केले जातात, असाही व्यापाऱ्यांत सूर उमटला. 

नुकसान अन्‌ मानसिक त्रासही 
बंदमुळे नुकसान तर होतेच, शिवाय या आरोपांचा नाहक मानसिक त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. अशा विविध कारणामुळे आता येथील चेंबर ऑफ कॉमर्सने एका बैठकीत हा धाडसी निर्णय घेतला आहे. कोणत्याही बंदमध्ये आता दुपारी बारापर्यंतच व्यवहार बंद ठेवून सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. 

संपादन - सचिन चराटी 
kolhapur