कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहचवण्यासाठी आहे 'ही' योजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन असतो. यावर्षीच्या कृषी दिनानिमित्त शासनाने या नव्या संकल्पनेची घोषणा केली आहे. कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणाही पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते.

गडहिंग्लज : यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासनाने 1 ते 7 जुलैअखेर कृषी संजीवनी सप्ताह राबवण्याचे ठरवले आहे. विविध तज्ज्ञांतर्फे आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्‍यातील कोरोना रुग्ण नसलेल्या 70 हून अधिक गावांत कृषी विभागाची ही संजीवनी पोहचणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. 

दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन असतो. यावर्षीच्या कृषी दिनानिमित्त शासनाने या नव्या संकल्पनेची घोषणा केली आहे. कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणाही पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागासह त्याच्या संलग्नित पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, सहकार, ग्रामविकास या विभागाच्या सहकार्याने गावागावांत मोहीम राबवावयाची आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क वापरणे आदी नियमांचे पालन करून गावागावांत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

या संजीवनी सप्ताहात गावभेट, शिवार फेरी, प्रक्षेत्र भेट, शेतीशाळा, किडरोग मार्गदर्शन, संरक्षित किट वापरून औषध फवारणी, नावीन्यपूर्ण शेतीप्रयोग केलेल्या शेतकऱ्याच्या क्षेत्राला भेट व चर्चा आदी मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, सेवक, पंचायत समिती कृषी अधिकारींसह संलग्नित विविध विभागांचे अधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. अद्यायावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी प्रभावीपणे करण्यासाठी मोहीम राबवण्यात येईल. उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम व तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील कोरोना रुग्ण नसलेल्या 70 हून अधिक गावांत ही कृषी संजीवनी सप्ताह साजरा होणार आहे. 

मोहिमेत काय असणार 
- शेतीचे उत्पादन खर्च कमी करण्यावर मार्गदर्शन 
- विविध कृषी योजनांचा प्रसार 
- उसातील हुमणी, सोयाबीन, भात पिकावरील किड मार्गदर्शन 
- बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके, कडधान्य आंतरपीक मार्गदर्शन 
- बहुपीक पद्धतीचा प्रसार, आधुनिक तंत्रज्ञानाबाबत घोषवाक्‍ये प्रदर्शित करणे 
- विविध पीक स्पर्धा, पुरस्कार 
- शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रसार 
- रुंद सरी वरंबा यंत्र वापर व पेरणीचे प्रात्यक्षिक 
- परंपरागत कृषी विकास योजनेवर मार्गदर्शन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now 'Krushi Sanjeevni Sapthah' By The Department Of Agriculture Marathi News