प्रभाग संघ देणार बचत गटांना बळ

अवधूत पाटील
Monday, 12 October 2020

महिला बचत गट चळवळ गावागावांत पोचली आहे. या बचत गटांना बळ देण्यासाठी शासनाने प्रभाग संघांची संकल्पना आणली आहे.

गडहिंग्लज : महिला बचत गट चळवळ गावागावांत पोचली आहे. या बचत गटांना बळ देण्यासाठी शासनाने प्रभाग संघांची संकल्पना आणली आहे. बड्याचीवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात तालुक्‍यातील पहिल्या प्रभाग संघाची स्थापना झाली आहे.

यामध्ये आठ ग्रामसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या बचत गटांचा समावेश आहे. शिवाय या मतदारसंघात नव्याने सुरू होणाऱ्या ग्रामसंघांनाही समाविष्ट केले जाणार आहे. 
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबन यावे यासाठी बचत गट चळवळीची सुरवात झाली. सहज उपलब्ध होणारा कर्जपुरवठा आणि कमी व्याजदरामुळे बचत गट चळवळ वाढीला लागली.

शासन स्तरावरून या बचत गटांना बळ देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी गाव स्तरावर ग्रामसंघांची स्थापना केली आहे. या ग्रामसंघात गावातील 20 ते 25 बचत गटांचा समावेश आहे. ग्रामसंघांना पहिल्या टप्प्यात 75 हजार रुपये अनुदान दिले होते. त्यानंतर तीन लाख रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी पुरविला आहे. याशिवाय या ग्रामसंघाना दीड लाखांचा व्हीआरएफ उपलब्ध होणार आहे. 

आता ग्रामसंघांना एकत्र करून प्रभाग संघांची स्थापना करण्याचे काम सुरू आहे. बड्याचीवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील आठ ग्रामसंघांना एकत्र करून प्रभाग संघाची स्थापना केली आहे. हनिमनाळ, बड्याचीवाडी, शेंद्री, हसूरचंपू, दुंडगे व नूल या गावातील ग्रामसंघांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्षांची समिती केली आहे. या प्रभाग संघाचे मतदारसंघातील बचत गटांवर संनियंत्रण राहणार आहे. बचत गटांचे कामकाज कसे चालवावे, त्याचा आढावा घेण्यासह उद्योग, व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 

महागाव, नेसरीत लवकरच सुरवात... 
बड्याचीवाडी मतदारसंघात पहिल्या प्रभाग संघाची सुरवात झाली आहे. यामध्ये आठ ग्रामसंघांचा समावेश आहे. तालुक्‍यात सध्या 27 ग्रामसंघ सुरू आहेत. याशिवाय 13 ग्रामसंघांची नव्याने सुरवात केली जाणार आहे. महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामसंघांना एकत्र करुन त्या ठिकाणी लवकरच प्रभाग संघ स्थापन केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Ward Teams Will Give Strength To Self-Help Groups Kolhapur Marathi News