शाळांची वाढणार पटसंख्या

रणजित कालेकर
Thursday, 25 June 2020

अजूनही कोरोनाची भिती दूर न झाल्यामुळे शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांची कुटुंबे गावगाड्यात तळ ठोकण्याच्या विचारात आहेत. त्यांनी पाल्यांच्या शिक्षणासाठी मराठी शाळांकडे संपर्क सुरू केला आहे.

आजरा : अजूनही कोरोनाची भिती दूर न झाल्यामुळे शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांची कुटुंबे गावगाड्यात तळ ठोकण्याच्या विचारात आहेत. त्यांनी पाल्यांच्या शिक्षणासाठी मराठी शाळांकडे संपर्क सुरू केला आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत निश्‍चित वाढ होणार आहे.

आजरा तालुक्‍यात चालू शैक्षणिक वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात 543 मुलांनी प्रवेश घेतला. हे चित्र निश्‍चित सुखद असून मराठी शाळांना पुर्वीचे सोनेरी दिवस येणार असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे गुढीपाडव्याच्या काळातच लॉक डाऊन झाल्याने मराठी शाळांची प्रवेश प्रक्रिया लांबली. महिनाभरापुर्वी शासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे प्रवेश नोंदणीला सुरवात झाली.

आजरा तालुक्‍यात 851 मुले प्रवेश पात्र होती. यापैकी 541 मुलांनी मराठी शाळेत प्रवेश नोंदवला आहे. सुमारे 62 टक्के मुलांनी मराठी शाळांना प्राधान्य दिले आहे. अनेक पालकांच्याकडे ऍनड्रॉईड मोबाईल नसल्याने प्रवेश प्रक्रियेबद्दल हे पालक अनभिज्ञ होते. त्यांच्याशी थेट संपर्क शिक्षक करू लागले आहेत. 

गेल्या अनेक वर्षापासून कमी होणारा जननदर, ग्रामीण भागातील कुटुंबाचे शहरीकडे रोजगारासाठी झालेले स्थलांतर, इंग्रजी शाळांचे वाढलेले प्रस्थ यामुळे मराठी शाळेंच्या पटसंख्येत घट होत असल्याची कारणे आहेत. यामुळे अनेक गावातील शाळा कमी पटसंख्येमुळे अडचणीत आल्या आहेत. पण यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीमुळे शहरातील कुटुंबे गावी परतली असून आपल्या पाल्याची गावातच शिक्षणाची व्यवस्था करण्याचे त्यांचे नियोजन सुरू झाले आहे. अनेक पालकांनी मराठी शाळांकडे संपर्क केला आहे. 

देवर्डे शाळेच्या पटसंख्येत वाढ 
जूनला पटनोंदणी झाली. त्यावेळी देवर्डे गावात पहिलीला दाखल पात्र 21 मुले होती. त्यांनी प्रवेश नोंदवला आहे. पाचवीचा पटही वाढला आहे. गेल्या 13 वर्षात मराठी शाळेचा 150 च्या आसपास पटसंख्या असायची. यंदा 164 पर्यंत गेली आहे. यंदा विक्रमी पट असेल, असे विद्यामंदिर देवर्डे शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सुतार यांनी सांगितले. 

पाच केंद्रातून विद्यार्थी वाढले
गतवर्षी तालुक्‍यात 6 हजार 350 पटसंख्या होती. यंदा पटसंख्येत 400 ते 500 ने भर पडणार आहे. तालुक्‍यातील पाच केंद्रातून विद्यार्थी वाढल्याचे सांगितले आहे. गावात मुंबई व पुण्याहून आलेल्या कुटुंबातील काही मुलांनी प्रवेश नोंदवला आहे. 
- बसवराज गुरव, सहाय्यक गटशिक्षणाधिकारी, आजरा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Number Of Primary Student Will Increase Kolhapur Marathi News