व्हिडीओ : लई भारी ! 92 वर्षाच्या आज्जी बाई नातवंडे, पतवंडे बरोबर खेळतात कॅरम...

old grandmother plays carom with grandchildren and great grandchildren in belgum
old grandmother plays carom with grandchildren and great grandchildren in belgum

बेळगाव - तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमा बघितलाय? मग त्यातला तो 'कॅरम'चा सीनही बघितलाच असेल. अंथरूणाला खिळलेल्या, वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या 'पप्पा' च्या बाजूला कॅरमचा डाव मांडल्यानंतर तो आपसूक उठतो अन कॅरम खेळायला लागतो. सिनेमातील तो प्रसंग भलेही 'फिल्मी' असेल पण अनेकांना भावला. जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले की मग वयाची आडकाठी येत नाही असा संदेश देणारा तो प्रसंग. बेळगावातील 92 वर्षे वयाच्या कमल नारायण कंग्राळकर या आपल्या मुली, नातवंडे व पणतवंडांसमोर कॅरम खेळू लागल्या, त्यांची बोटे सराईतपणे कॅरम बोर्डवरून फिरू लागली की तुम्ही थक्क व्हाल. तुम्हा मुन्नाभाई सिनेमातील तो पप्पा व तो प्रसंगही आपसूक आठवेल.

होय, येथील भडकल गल्लीतील कमल कंग्राळकर वयाच्या 92 व्या वर्षी सराईतपणे कॅरम खेळतात. ज्या वयात डोळ्यांना नीट दिसत नाही, हाता-पायात त्राण शिल्लक नसतो, दुसऱ्यांचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही, नीट ऐकू येत नाही, त्या वयात नातवंडे व पणतवंडांसोबत या आज्जीबाई कॅरम खेळतात, अन तेही अगदी सफाईदारपणे. सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कमल यांचे मूळ निवासस्थान भडकल गल्लीत आहे. पण लॉक डाऊन काळात त्या डिफेन्स कॉलनी येथील राजश्री प्रमोद जाधव या आपल्या मुलीच्या घरी वास्तव्यास गेल्या. आधी त्या घरी कॅरम खेळायच्या, पण पतीच्या निधनानंतर त्या आपल्या घरी एकट्याच रहायच्या, त्यामुळे कॅरमचा खेळ बंद झाला. आता लॉक डाऊन काळात त्यांनी पुन्हा कॅरम खेळण्यास सुरूवात केली, अन त्यांचा खेळ पाहून त्यांच्या मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे सारेच आवाक झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने मंगळवारी (ता.7) त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून संवाद साधला, त्यावेळी आजीबाईंनी खणखणीत मराठी भाषेत संवाद साधला. महिला विद्यालय, मराठा मंडळ येथे शिक्षण झाल्याचे त्या म्हणाल्या. लग्नानंतर कॅरम खेळायला शिकल्याचे व घरच्यांसोबत नियमितपणे कॅरम खेळत असल्याची आठवण त्यानी सांगीतली.

टीव्हीवर क्रिकेटचा सामना सुरू असला की न चुकता त्या पाहतात. त्यांची स्मरणशक्ती अजूनही चांगली आहे. त्या मोबाईल वापरतात, टीव्ही व सेट टॉप बॉक्‍सचा रिमोट सराईतपणे हाताळतात. विशेष म्हणजे त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यापैकी काहीच नाही. 3 मुलगे व पाच मुलींचा सांभाळ त्यांनी केला, पण कॅरमचा बोर्ड त्यानी सोडला नाही. लॉक डाऊन काळात अनेकाना नैराश्‍य आले, अनेकांनी आपले जीवन संपविले, अनेकजण निराशेच्या गर्तेत आहेत, त्या सर्वांसाठी या आज्जीबाई प्रेरणास्त्रोत ठरू शकतात.


कमल कंग्राळकर या माझ्या पत्नीच्या आजी. मी त्यांचा कॅरमचा खेळ पाहून थक्क झालो. 92 व्या वर्षी साधारणतः माणसाची जगण्याची उमेद नाहीशी होते, पण त्यांचा उत्साह नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. - दिनेश पाटील, मार्कंडेयनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com