नऊ तोळ्यांचे दागिणे चोरणाऱ्या एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

तीन जानेवारीला दिपाली कोळी या आपल्या कुटुंबीयासह कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी जाण्यासाठी सतीश सावंत यांची चारचाकी कार भाड्याने घेतली होती

कुरुंदवाड - आलास (ता. शिरोळ) येथील एका घरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सतीश सावंत (रा.शिरोळ) असे संशयीताचे नांव आहे. याबाबतची फिर्याद दिपाली दत्तात्रय कोळी (रा.आलास.ता.शिरोळ,मूळ रा.सांगली) यांनी येथील पोलिसात दिली आहे.

याबाबत माहिती अशी, तीन जानेवारीला दिपाली कोळी या आपल्या कुटुंबीयासह कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी जाण्यासाठी सतीश सावंत यांची चारचाकी कार भाड्याने घेतली होती. सावंत हा चालक म्हणून आला होता. दरम्यान दिपाली कोळी यांनी आपले दागिने पर्स मध्ये ठेवले होते. देवदर्शन करून आल्यानंतर पर्स मधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असता दिपाली कोळी यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ विजय घाटगे,प्रकाश हंकारे यांनी या चोरी प्रकरणी चालक सतीश सावंत याची कसून चौकशी केली असता सावंत याच्याकडून चार तोळ्यांच्या सोन्याच्या दोन पाटल्या, चार तोळ्यांच्या सोन्याचे चार बिलवर,अर्ध्या तोळ्यांच्या सोन्याच्या दोन पिळ्यांच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे सोन्याचे मनी गंठण हार, चांदीचे पैंजण असे दोन लाख 87 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चोरीत वापरलेली कार असा एकूण अाठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested for stealing nine pound jewelery kolhapur