भयानक : जिलेटीनच्या स्फोटात एक ठार ; शरीराचे तुकडे पाहून गावकरी गेले हादरून  

चेतन लक्केबैलकर
Wednesday, 25 November 2020

दुचाकीचालक शिवकुमार रजपूत हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकला गेला

खानापूर (जि. बेळगाव) : जिलेटीनच्या विचित्र स्फोटात एकजण ठार झाल्याची घटना नंदगडजवळील माचीगड येथे आज बुधवारी सातच्या सुमारास घडली. डुक्करांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे जिलेटीन बाँबचा टॅक्टर-दुचाकी अपघातानंतर स्फोट झाला. त्यात दुचाकी आणि ट्रॅक्टरचे नुकसान झाले तर दुचाकीस्वार गिरीष धर्मानंद रजपूत (वय २८, मूळ रा.हक्कीपक्की कँप-शिमोगा) याचा मृतदेह छिन्नविछीन्न स्थितीत शिवारात विखुरला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शिमोगा येथील हक्कीपक्की कँप येथील वंजारी समाजातील कुटूंबे खानापूर तालुक्याच्या विविध भागातील जंगलात जिलेटीन बाँबच्या सहाय्याने डुकरांची शिकार करतात. सध्या बिडी येथे वास्तव्यास असलेल्यांपैकी मयत गिरीश धर्मानंद रजपूत आणि त्याचा साथीदार शिवकुमार गजेंद्र रजपूत (वय २८) यांनी माचीगडच्या जंगलात रात्री जिलेटीन बाँब ठेवले होते. सकाळी शिकार न झाल्याने ते बाँब घेऊन तांड्याकडे जातांना ही घटना घडली. 
ते दोघे दुचाकीवरून नंदगडकडे जात असतांना नंदगडहून माचीगडला जाणाऱ्या ट्रॅक्टरशी टक्कर झाली. दुचाकीवर मागे बसलेला गिरीश याच्या हातातील बाँब असलेली पिशवी ट्रॅक्टरच्या मागील टायरखाली सापडल्याने मोठा स्फोट झाला.

दुचाकीचालक शिवकुमार रजपूत हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकला गेला. तर मागे बसलेला गिरीष याचे तीन तुकडे होऊन बाजुच्या शिवारात जाऊन पडले. ट्रॅक्टरदेखील रस्त्याच्या कडेला गटारीत कोसळला. यातून ट्रॅक्टरचालक अभिजीत अर्जून बेळगावकर (वय १९ रा.नंदगड) हा सुदैवाने बचावला. 
मयत गिरीष याच्या शरीराचा कंबरेपासून वरचा भाग घटनास्थळापासून सुमारे अडीचशे फुटावर जाऊन पडला होता. तर मागचा कंबरेखालील भाग व एक हात शंभर फुटांवर पडला होता. पोटातील आतडी झाडांवर लोंबकळत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी आणि नंदगडचे उपनिरीक्षक यु.एस.आवटी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

हे पण वाचा माझा जप केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील

..आणि गाव हादरून गेले

 
माचीगड येथील नागरीक नुकतेच झोपेतून जागे झाले होते. नेहमीच्या कामांत गर्क असतांनाच प्रचंड अशा आवाजाने ग्रामस्थ हादरून गेले. प्रत्येकजण आवाजाच्या दिशेने धावला. तेथील चित्र पाहून सर्वानाच धडकी भरली. गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असल्याने प्रचंड आवाजामुळे नागरिकांना धडकी भरल्याचे जाणवत होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in gelatin blast at belgaum