साडेपाच हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

अवधूत पाटील
सोमवार, 1 जून 2020

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी दरवर्षी गुढी पाडवा, प्रवेश वाढवा अभियान राबविले जाते. यंदा गुढी उभारण्यापूर्वीच कोरोनाने सर्वत्र हातपाय पसरले. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी फिरण्यावर मर्यादा आल्या. मात्र, जिल्ह्यातील पाच हजार 502 विद्यार्थ्यांची आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये चार हजार 854 विद्यार्थी पहिलीचे तर 648 विद्यार्थी दुसरी ते आठवीचे आहेत. नोंदणी झालेले विद्यार्थी दरवर्षीच्या तुलनेत कमी असले तरी संचारबंदीच्या काळात झालेले हे कामही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल.

गडहिंग्लज : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी दरवर्षी गुढी पाडवा, प्रवेश वाढवा अभियान राबविले जाते. यंदा गुढी उभारण्यापूर्वीच कोरोनाने सर्वत्र हातपाय पसरले. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी फिरण्यावर मर्यादा आल्या. मात्र, जिल्ह्यातील पाच हजार 502 विद्यार्थ्यांची आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये चार हजार 854 विद्यार्थी पहिलीचे तर 648 विद्यार्थी दुसरी ते आठवीचे आहेत. नोंदणी झालेले विद्यार्थी दरवर्षीच्या तुलनेत कमी असले तरी संचारबंदीच्या काळात झालेले हे कामही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसमोर गेल्या काही वर्षांपासून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आव्हान उभा राहिले आहे. त्याला मोडीत काढण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फेही विविध उपक्रम राबविले जातात. स्थानिक स्तरावर शाळांकडूनही गुणवत्ता वाढीवर भर दिला आहे. त्यातूनही पटसंख्या टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत "गुढी पाडवा, प्रवेश वाढवा' अभियान राबविले जाते. त्याअंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घरोघरी भेटी देतात. इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी करून घेतात. 

पण, यंदा अडचणीची परिस्थिती निर्माण झाले. गुढी पाडव्यापूर्वीच कोरोनाचे संकट उभा राहिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांना बाहेर पडणे मुश्‍कील झाले. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लिंक तयार केली. पालकांनी या लिंकवर जाऊन माहिती भरायची होती. काही ठिकाणी त्यांना मुख्याध्यापकांनीही मदत केली. यामाध्यमातून जिल्ह्यात पहिलीसाठी चार हजार 854 तर दुसरी ते आठवीसाठी 648 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत दरवर्षी होणाऱ्या नोंदणीच्या तुलनेत ही संख्या जरूर कमी आहे. पण, कोरोनाचे संकट समोर उभा असताना सर्वच क्षेत्रांचे कामकाज ठप्प झालेले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची झालेली ऑनलाइन नोंदणी बरीच म्हणावी लागेल. शाळांचे कामकाज प्रत्यक्ष सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा कालावधी जाण्याची शक्‍यता आहे. या उर्वरित कालावधीत विद्यार्थ्यांच्या नोंदणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

यंदा पटसंख्या वाढण्याचा अंदाज... 
कोरोनाची आपत्तीची झळ सर्वच क्षेत्रांना बसलेली आहे. पण, जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ती इष्टापत्ती ठरू शकते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई-पुण्यावरुन परतलेली अनेक कुटुंब गावीच स्थायिक होण्याची शक्‍यता आहे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रवेश गावातील शाळेत होऊ शकतात. तसेच आर्थिक गणित कोलमडल्यामुळे पालकांकडून शहरातील खासगी शाळांकडे पाठ फिरविली जाण्याचीही शक्‍यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दुसरी ते आठवीसाठी 648 नव्या विद्यार्थ्यांची झालेली नोंदणी त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Registration Of Five And A Half Thousand Students In Kolhapur Kolhapur Marathi News