गेल्या पंधरा दिवसापासून हत्तीच्या कळपाकडून भात पिकाचे सुरू आहे नुकसान

सुनील कोंडुसकर
Monday, 7 September 2020

दहाच्या सुमारास हत्ती शिवारात आल्याची चाहूल लागताच दीपक गावडे याने फटाके वाजवून त्यांना हुसकावून लावले. 

चंदगड : पार्ले (ता. चंदगड) परिसरात हत्तीच्या कळपाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हा कळप या विभागात असून काल रात्री गावानजीकच्या शिवारात त्यांनी धुडगूस घातला.

दहाच्या सुमारास हत्ती शिवारात आल्याची चाहूल लागताच दीपक गावडे याने फटाके वाजवून त्यांना हुसकावून लावले. गेल्या काही वर्षापासून कर्नाटकातून हत्ती या विभागात येतात. दरवर्षी सुगीच्या तोंडावरच ते दाखल होतात. हाताशी आलेले भात व इतर पिके खाऊन फस्त करतात.

शनिवारी रात्री चार हत्तींचा कळप गावच्या शिवारात दाखल झाला. रामकृष्ण जानकू गावडे, सूर्यकांत खाचू गावडे, नारायण चाळू गावडे, महादेव गणू गावडे, रामू पुंडलिक गावडे, बाबू नारायण गावडे, ओमाणा तानाजी मयेकर, नंदू झीलू गावडे आदी शेतकऱ्यांचे भात, नाचणा तसेच मेसकाठी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

हत्तींसारख्या ताकतवान प्राण्याला हुसकावून लावताना यापूर्वी काही शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे भितीने शेतकरी रखवालीला जात नाहीत. त्यामुळे गवे व रानडुक्करांचा उपद्रव वाढला आहे. दरम्यान वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनरक्षक एस. एच. पाटील, वनसेवक अर्जून पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.  

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Paddy Crop Has Been Damaged By The Elephants In Chandgad Kolhapur Marathi News