दख्खनच्या राजाच्या पालखीची परंपरा कायम ठेवा; पुजारी ग्रामस्थ आग्रही

निवास मोटे 
सोमवार, 6 एप्रिल 2020

जोतिबा डोंगरावर गेल्या पंधरा दिवसापासून पुणे मुंबई सह इतर राज्यातील कोणत्याही भाविकांनी प्रवेश केलेला नाही. मंदिराचे बाहेरील सर्व दरवाजे बंद आहेत. 

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील चैत्र यात्रेचा उद्या मुख्य दिवस आहे. या यात्रेत सायंकाळी होणाऱ्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम रहावी यासाठी ग्रामस्थ पुजारी आग्रही आहेत. केवळ पंधरा ग्रामस्थ पुजारी यांच्या उपस्थित हा पालखी सोहळा जोतिबा मंदिर ते यमाई मंदिरापर्यंत काढण्याची परवानगी मिळण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे साकडे घातले आहेत.

हाताला सॅनीटायझर लावून, मास्क वापरून ठरावीक अंतरावर उभे राहून तसेच प्रशासनचे सर्व नियम व अटींचे पालन करून अगदी सुरक्षितपणे आम्ही उद्याचा पालखी सोहळा पार पाडू, असे स्थानिक पुजारी ग्रामस्थांचे मत आहे. वर्षानुवर्षे सुरू असणारी यात्रेतील पालखी सोहळ्याची परंपरा खंडित करू नये, अशी या मागणी प्रशासनाकडे केली आहे. पण प्रशासनाने यात्रेसाठी मनाई केली आहे. पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे, पालकमंत्री सतेज पाटील यांनी पालखी सोहळ्याबाबत चर्चा केली आहे. जोतिबाचे उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनीही पालखी सोहळ्यावेळीची  ग्रामस्थांमार्फत स्वःत सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. पण प्रशासन ठाम आहे. या सोहळ्या विषयी संभ्रामावस्था आहे.

जोतिबा डोंगरावर गेल्या पंधरा दिवसापासून पुणे मुंबई सह इतर राज्यातील कोणत्याही भाविकांनी प्रवेश केलेला नाही. मंदिराचे बाहेरील सर्व दरवाजे बंद आहेत. 

दरम्यान, उद्या डोंगरावर कोणत्याही भाविकाने प्रवेश करू नये म्हणून कुशिरे पोहाळे गिरोली दाणेवाडी ही गावे तीन दिवसांसाठी लॉकडाऊन केली असून जोतिबा डोंगराकडे येणार्‍या सर्व वाटेवर आजपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चैत्र यात्रेतील शासकीय अभिषेक , जोतिबा देवाची महापूजा यांचे लाईव्ह दर्शन भाविकांना देण्यात यावे. घर बसल्या भाविकांना या दर्शनाचा लाभ होईल. पंधरा लोकांनी उद्याचा पालखी सोहळा काढावा, ही परवानगी प्रशासनाने द्यावी. 
-शिवाजीराव सांगळे, उपसरपंच, जोतिबा डोंगर

यात्रेसंदर्भातील आठ दिवसा पूर्वी झालेल्या बैठकीत प्रशासनाने जोतिबा देवाची पालखी टेंपोतून यमाई मंदिराकडे न्या असे सूचविले आहे. कालपासून तर प्रशासन म्हणते यात्रेच्या दिवशी श्रींची उत्सवमूर्ती चारचाकी वाहनातून शिवाजांच्या पुतळ्यामार्गे नवीन वसाहत, पाण्याची टाकी मार्गे यमाई मंदिरात न्यावी. त्याठिकाणी धार्मिक विधी करावेत असे त्यांचे मत आहे. पण या मताशी ग्रामस्थ पुजारी नाराज आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people demand to continue jotiba yatra