esakal | घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ; ग्रामस्थ संतप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

people protest in belgaum

प्रथम बसस्थानक येथे मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर घागर मोर्चा ग्रामपंचायतीवर नेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. 

घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ; ग्रामस्थ संतप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी : तालुक्यातील पाश्चापूर येथे पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त बनले आहेत. मागणीची दखल न घेतल्याने अखेर आज (ता. २१) घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. तसेच मानवी साखळी करून त्वरित पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेकडो महिला व मुलांनीही सहभाग घेतला होता.

प्रथम बसस्थानक येथे मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर घागर मोर्चा ग्रामपंचायतीवर नेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. 

पाश्चापूर येथे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. पंधरा दिवसातून एकदा पाणी येत असल्याने प्रामुख्याने महिलांना त्रास होत आहे. तसेच वृद्ध व मुलांवरही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे, असे महिलांनी सांगितले.
 जाकीर नदाफ म्हणाले, 'येथे पाण्याची भीषण समस्या आहे. शेजारील खेडी व बेळगावला हिडकल जलाशयातून याच मार्गाने पाणीपुरवठा होतो. मग आमच्याच गावाला पाणी का नाही? जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली आहेत. मात्र त्यांचे मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर उतरावे लागले आहे. पाण्याची सोय न झाल्यास येत्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. '

सुनीता मडिवाळ यांनी, पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला.
 आंदोलनात बादशहा फनिबंद, बसवराज उदोशी, बसवन्ना अंबिगेर, महेश उगार, सलीम मोगल, नदीम मुजावर, बसू गुबची, बादशहा मुल्ला, महादेवी शिदलीहाळ, पार्वती शिदलीहाळ, शांता शिदलीहाळ, जरीना दर्गा, इमाबू नदाफ, आयेशा मोमीन, सूरय्या अतार, शंकर मडिवाळ, गणपती काकडे, बसवराज शिंदे व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

'पाणी उशाला, कोरड घशाला'
पाश्चापूरच्या उजव्या बाजूला मार्कंडेय नदी, डाव्या बाजूला घटप्रभा नदी पाच किलोमीटरवर राजा लखमगौडा जलाशय आहे. पण येथे 'पाणी उशाला, कोरड घशाला' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे पण वाचा - तयारी पूर्ण झाल्यानंतरच टप्याटप्याने शाळा सुरू होणार

आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने व केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत येथे पाण्याच्या योजनेसाठी ५ कोटी 32 लाखाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरच पाणीप्रश्न मिटणार आहे.

-श्री. वासुदेव, ग्रामविकास अधिकारी

'पाश्चापूर येथे सात प्रभाग आहेत. तेथे आठ-दहा दिवसात कूपनलिकांची खोदाई करून तातडीने पाण्याची सोय करून देण्यात येईल.'

-मंजुनाथ पाटील, जिल्हा पंचायत सदस्य

संपादन - धनाजी सुर्वे