esakal | सीमाभागात तणाव; शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

police escort near shiv sena and ncp office in belgaum

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्यासह कर्नाटकातील अन्य नेत्यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे

सीमाभागात तणाव; शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर कन्नड संघटनांनी केलेले आंदोलन या पार्श्‍वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी 14 नोव्हेंबर रोजी मराठा विकास प्राधिकरणची स्थापना केली. त्यासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद केली. एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून त्याबाबत आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेलाही विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सीमाप्रश्‍नाबाबतच्या पाठपुराव्याला वेग आला आहे. त्यामुळेच मंगळवारी (ता.17) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्याबाबत मोठे वक्तव्य केले. बेळगाव, कारवारसह कर्नाटकातील मराठीबहुलभाग महाराष्ट्रात आणण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचे पडसाद बेळगावात व कर्नाटकात उमटले आहेत. बुधवारी (ता.18) काही कन्नड संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यांच्या प्रतिमेचे दहन येथील चन्नम्मा चौकात केले. राज्यात अन्य काही ठिकाणीही असे आंदोलन करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्यासह कर्नाटकातील अन्य नेत्यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यामुळे सीमाप्रश्‍नावरून सीमाभागातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात मराठी भाषिक काळा दिन साजरा करतात. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे सीमा समन्वयमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळ्या दिनी महाराष्ट्राचे सर्व मंत्री काळ्या फिती बांधून कामकाज करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पडसादही बेळगावसह कर्नाटकात उमटले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची जीभ घसरली होती. सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगावसह सीमाभाग कर्नाटकातच राहिल असेही ते म्हणाले. सवदी यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रात निषेध झाला होता.

हे पण वाचाकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य 

काळ्या दिनी सीमाभागात कानडी पोलिसांनी दडपशाही केली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. मराठा विकास प्राधिकरण स्थापनेला विरोध झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन पक्षांमध्येही आरोप प्रत्योरोप सुरू झाले आहेत. त्यातून सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे