गडहिंग्लजमधील संजय गांधी योजना समिती निवडीला ग्रहण

अजित माद्याळे
Saturday, 14 November 2020

गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष निवडीच्या बाबतीत "आधीच उल्हास...त्यात फाल्गुन मास' अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष निवडीच्या बाबतीत "आधीच उल्हास...त्यात फाल्गुन मास' अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे. या पदाच्या निवडीचे कवित्व अजूनही संपलेले नाही. आधीपासून या पदासाठी राष्ट्रवादी अंतर्गत सुरू झालेली स्पर्धा, त्यातून मार्ग काढत नेत निर्णयापर्यंत आले असताना आता पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या आचारसंहितेचे त्याला ग्रहण लागले आहे. 

गडहिंग्लज शहरासह कडगाव-कौलगे जि. प. गट कागल, तर उर्वरित तालुका चंदगड मतदारसंघात विभागला आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीनंतर या समितीची फेररचना होते. विधानसभा निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी अद्याप नव्या रचनेला मुहूर्त मिळालेला नाही. ज्यावेळी रचनेची चर्चा सुरू झाली तेव्हापासून अध्यक्षपद कोणाला द्यायचे, या मुद्यावर कागल आणि चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली. गडहिंग्लजचे नगरसेवक हारुण सय्यद आणि चन्नेकुप्पीतील पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांच्यात रस्सीखेच आहे. 

दरम्यान, चंदगड तालुक्‍याचे अध्यक्षपद आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्याला, तर गडहिंग्लजचे अध्यक्षपद कागल मतदारसंघातील मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते श्री. सय्यद यांना संधी देण्याबाबत विचार सुरू झाला. दरम्यान, पूर्वीपासून चंदगड मतदारसंघाकडे असलेले हे हक्काचे पद चंदगडलाच मिळावे म्हणून श्री. चव्हाण यांनी शिष्टमंडळाद्वारे आमदार पाटील यांना भेटून आग्रही मागणी केली. राष्ट्रवादीच्याच दोन मतदारसंघात सुरू असलेल्या या धुसफूसीने अध्यक्षपद निवडीला ब्रेक लागला. 

गेल्या महिन्यात अमर चव्हाण यांना जिल्हा नियोजन मंडळावर संधी देण्याची चर्चा सुरू झाली. त्यांना तेथे संधी दिल्यानंतर श्री. सय्यद यांना "संगायो' समितीचे अध्यक्ष करण्याचा मार्ग सुकर होणार होता. परंतु श्री. चव्हाण यांनी नियोजन मंडळाचे सदस्यत्वच नाकारले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पक्षाचे नेते श्री. मुश्रीफ व श्री. पाटील कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळात अंतर्गत स्पर्धेमुळे निवड लांबली असतानाच आता पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेमुळे पुन्हा महिनाभर लांबले आहे. एकंदरीत या पदासाठी चंदगड आणि कागल मतदारसंघात सुरू झालेली रस्सीखेच राजकीय पटलावर विशेष चर्चेत आली आहे. 

पदासाठी दोघेही योग्य... 
निराधारांसह वृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पेन्शन मंजुरीचे काम या समितीकडे असते. यापूर्वी काही वर्षे या समितीवर श्री. सय्यद यांनी काम केले असून अनेकांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. चव्हाण सभापती असताना तालुका पिंजून काढला असून गरजूंना पेन्शनचा लाभ दिला आहे. दोघांचेही काम या पदासाठी योग्य असले, तरी एकालाच संधी मिळणार आहे; परंतु मतदारसंघातील स्पर्धेमुळे हे पद कोणाला द्यायचे, हे आता नेत्यांच्या हातात आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Politics Of Sanjay Gandhi Yojana Samiti Election In Gadhinglaj Kolhapur Marathi News