'खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण, त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

अतिवृष्टीने  झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर मंगळवारपासून सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत

सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. खडसे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. खडसे यांच्या टीकेनंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

अतिवृष्टीने  झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर मंगळवारपासून सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे आणि करगणी परिसरात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, भाजपने एकनाथ खडसे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य काळच ठरवेल. पण पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षावर आरोप करणे योग्य नाही, 'खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण आहे. त्यामुळे खच्चीकरण केले की पक्षाने मोठे केले. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही, भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही.''

'भाजपचे सरकार असताना नऊ खाती खडसे यांच्याकडे होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता अन्यायाची फक्त एकच बाजू समोर येत आहे. असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

हे पण वाचापंचवीस वर्षापासून पतीचा हात हातात घेऊन दृष्टीहिन पतीचा आधार बनली इंदिरा  
 
मुख्यमंत्र्यांवरही टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांचे पाहणी दौरे रेड कार्पेटवरून होत आहेत. या दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावे. मात्र, शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी.' असा टोलाही दरेकर यांनी लगावला. 

हे पण वाचा - हृदयद्रावक : वर्षभरापूर्वीच मुलीला अन् आता एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या आई वडिलांचा आक्रोश 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin darekar criticism on eknath khadse