'या' घोषणेआधीच गावागावांत रंगू लागलेत पार्ट्यांचे बेत...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

ग्राम पंचायत निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह स्थानिक संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक आणि त्यांना पाठबळ देऊन रिंगणात उमेदवार उतरविले जातात.

बेळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच आता इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. तालुक्‍यात आतापासूनच निवडणुकीची फड तयार होण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीमुळे शहरात पार्ट्या आणि कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामुळे निवडणुका गावामध्ये आणि पार्ट्या शहरात असे चित्र निर्माण झाले आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

ग्रा.पं. निवडणुकीची लगबग; उमेदवार झाले सक्रिय  

ग्राम पंचायत निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह स्थानिक संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक लढविली जात नसली तरी पक्षाचे समर्थक आणि त्यांना पाठबळ देऊन रिंगणात उमेदवार उतरविले जातात. अशा प्रकारात भाजपकडून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचाच एकभाग म्हणून बुधवारी (ता. २६) जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आणि महानगर अध्यक्षांचा ऐतिहासिक पदग्रहणाचा भव्य समारंभ झाला. याप्रसंगी आगामी निवडणुकांचे रणशिंगे फुंकून तयारीला लागण्याचे आदेश भाजपचे राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी दिले आहेत. या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच पंचायत पातळीवर आक्रमकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. बूथनिहाय, विभाग पातळीवर आणि तालुका पातळीवर संघटना बांधणी अधिक मजबूत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पार्ट्यांचे नियोजन

काँग्रेस, धजदकडून अद्याप कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. कर्नाटक राज्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्यासह विरोधीपक्ष नेता निवडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील महिन्यांत याची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. यामुळे नूतन अध्यक्षांवर आगामी निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. सध्या धजदच्या गोटात मात्र शांतमय वातावरण दिसून येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि स्थानिक पक्षांकडून तयारी सुरू केली असून कार्यकर्त्यांची मोट बांधणी, संपर्क वाढविणे, गाठीभेटी घेणे, कार्यक्रम आयोजित करणे, पार्ट्यांचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The preparations for the aspirants have accelerated well before the announcement of the Gram Panchayat elections in belgum