esakal | ना कंदील, ना पणती: आख्खी बहिरेवाडी दुःखसागरात; आस ऋषीकेश यांचे पार्थिव येण्याची
sakal

बोलून बातमी शोधा

preparations bahirewadi  village for the Funeral  soldier rishikesh  jondhale

ऋषीकेशवर अंत्यसंस्काराची तयारी
ग्रामस्थांना आस पार्थिवाची; शाळेच्या पटांगणात चबुतरा उभारणी

ना कंदील, ना पणती: आख्खी बहिरेवाडी दुःखसागरात; आस ऋषीकेश यांचे पार्थिव येण्याची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उत्तूर: बहिरेवाडी (ता. आजरा) येथील हुतात्मा जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी गावात तयारी सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी चबुतरा उभारणी सुरू केली आहे. दरम्यान, जम्मूहून रविवारी किंवा सोमवारी पार्थिव गावात पोचण्याची शक्‍यता प्रशासनाने वर्तविली आहे.


सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत ऋषीकेशना वीरमरण आले. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने साऱ्या गावावर शोककळा पसरली. ऋषीकेश यांचे वडील आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. तालुक्‍यातील औषध विक्रेत्यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. ऋषीकेश यांच्यावर भैरवनाथ हायस्कूलच्या पटांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला.

आज सकाळपासून पटांगणाची तरुणांनी स्वच्छता केली. परिसराचे सपाटीकरण करून चबुतरा उभारण्यात आला. दरम्यान, गावच्या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करणारे फलक उभारले आहेत.ऋषीकेश यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. डॉजबॉल हा त्यांचा आवडीचा खेळ होता. या खेळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर मजल मारून अनेक पदके मिळवली आहेत. तेलंगणामध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
त्यांच्या वडिलांचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे. मुलाने हा व्यवसाय पुढे चालू ठेवावा, अशी त्यांच्या परिवाराची इच्छा होती; मात्र ऋषीकेशनी लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती. 


ना कंदील, ना पणती
ऐन दिवाळीत गावच्या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले. त्यामुळे आख्खी बहिरेवाडी दुःखसागरात बुडाली. गावात एकाही दारात ना कंदील पेटला ना पणती. आस लागली आहे ती केवळ ऋषीकेश यांचे पार्थिव येण्याची.

संपादन- अर्चना बनगे