
गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे ठिकाण असलेल्या आजऱ्यात "एक गाव एक गणपती'चा उपक्रम राबवण्यावर शिक्कामोर्तब झाला. गडहिंग्लजमध्येही असे घडणे शक्य आहे. शहरासह ग्रामीण भागात "एक गाव एक गणपती' संकल्पनेद्वारे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे शक्य असून, त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 20) सकाळी नगरपालिका, पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
गणेशोत्सवाचे सीमाभागातील महत्त्वाचे केंद्र म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. निम्म्याहून अधिक मंडळांकडून गणेशोत्सव कालावधीत महाप्रसादाचे वाटप होते. पारंपरिकसह सद्य:स्थितीतील सामाजिक समस्यांवर आधारित देखावे उभारण्याची कला येथील कार्यकर्त्यांत आहे.
सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा कालावधी आहे. ऑगस्टमध्ये गणेशोत्सव काळातही कोरोना असणार यात शंका नाही. या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन साध्या पद्धतीने किंवा "एक गाव-एक गणपती' संकल्पना राबवणे नागरिकांच्या आणि मंडळांच्या हिताचे ठरणार आहे. आजऱ्याने तसा निर्णय घेऊन हे घडू शकते याची प्रचिती दिली आहे.
गडहिंग्लज शहराचा विस्तार अधिक आहे. त्याप्रमाणात मंडळांची संख्याही अधिक आहे. येथे "एक गाव-एक गणपती' राबवणे आव्हानाचे असले तरी अशक्य नाही. गडहिंग्लज हे विधायक वाटेवरील एक गावच आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीला येथे नागरिकांचे निश्चित पाठबळ मिळते. यामुळे गडहिंग्लज शहर आणि ग्रामीण भागातही "एक गाव-एक गणपती' हा उपक्रम यशस्वी होणे शक्य आहे. त्यासाठी नगरपालिका, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे जितके महत्त्वाचे आहे, त्यांच्या हाकेला मंडळांनीही साथ देणेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.
नवे घडविण्याची संधी...
पुरोगामी विचारसरणीच्या या शहराने यापूर्वी अनेक विधायक बाबींना पाठबळ देऊन राज्य व देशभरात गडहिंग्लजला लौकीक मिळवून दिला आहे. आता कोरोना आणि गणेशोत्सव रूपाने विधायक आणि नवे घडविण्याची संधी चालून आली आहे. प्रशासनाला सहकार्य करून विधायकतेचा झेंडा लावण्यात मंडळांनीही पुढाकार घेतल्यास आजऱ्याच्या धर्तीवर एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.
दृष्टिक्षेपात गणेशोत्सव
- शहरातील मंडळांची संख्या : 33
- तालुक्यातील मंडळे : 131
- दरवर्षीचे "एक गाव-एक गणपती' : 27
- तालुक्यातील एकूण गावे : 89
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.