गावागावातील दक्षता समितीला "ऍक्‍टीव्ह' करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात नवी शक्कल

अजित माद्याळे
सोमवार, 13 जुलै 2020

काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अलगीकरणाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी होत नसल्याने स्थानिकांनाही लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गडहिंग्लज : काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अलगीकरणाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी होत नसल्याने स्थानिकांनाही लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. गावागावात कोरोनाविषयी उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आता गाव व मंडलनिहाय भरारी पथकांची नियुक्ती होणार आहे. या पथकाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी मे व जून महिन्यात गावपातळीवर कडक केली. ग्राम दक्षता समित्यांनी ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली. मध्यंतरी रूग्णांचा आलेख थांबल्यानंतर या समित्यांमध्ये ढिलाई आली. संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय असलेल्या अलगीकरणाचे नियम गावतपाळीवर धाब्यावर बसू लागले. बाहेरून येणाऱ्यांना संस्थात्मक ऐवजी गृह अलगीकरणात ठेवले जात आहे. यातून स्थानिक संसर्ग वाढला. गडहिंग्लज तालुक्‍याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर आतापर्यंत तालुक्‍यात 25 स्थानिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. हे गंभीर आहे. संस्थात्मक अलगीकरण झाले असते, तर या स्थानिकांना बाधा झाली नसती. 

स्थानिक संसर्ग होवू नये म्हणून आता भरारी पथकांची मात्रा प्रशासनाने शोधली आहे. तहसीलदार दिनेश पारगे व गटविकास अधिकारी शरद मगर यांनी यांच्या मार्गदर्शनाने पथकांची स्थापना होत आहे. गाव आणि मंडलनिहाय ही पथके कार्यरत राहतील. मंडल अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मंडलनिहाय पथकात पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक सदस्य असतील. गावनिहाय पथकात संबंधित मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवकांचा समावेश असेल.

गावात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर हे पथक लक्ष ठेवेल. अलगीकरणाचे नियम, बाहेरून आलेल्यांचा आढावा, ग्राम समितीशी सातत्याने संपर्क, संस्थात्मक अलगीकरणातील सुविधा, भौतिक अंतर, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, दक्षता समित्यांची सभा घेणे, समित्यांच्या कामकाजातील त्रुटींमध्ये सुधारणा करणे, खासगी डॉक्‍टरांकडे तपासणी होणाऱ्या रूग्णांची माहिती, लक्षणे असणाऱ्यांची यादी घेणे, स्वॅब आवश्‍यक असलेल्या व्यक्तींना कोविड सेंटरला पाठविणे, जनजागृतीच्या सूचना देणे, गावात आरोग्य पर्यवेक्षकांच्या भेटी होतात की नाही, प्रतिबंधीत क्षेत्राचे पाळले जाणारे नियम आदी उपायांवर लक्ष ठेवून त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी या पथकाची असेल. 

अलगीकरणात गोंधळ... 
अलगीकरणाच्या नियमांत प्रचंड गोंधळ गावपातळीवर सुरू आहे. त्यात राजकारण होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बाहेरून आलेल्यांना संस्थात्मक ऐवजी गृह अलगीकरणात मोठ्या प्रमाणात ठेवले जात आहे. हा प्रकार म्हणजे स्थानिक संसर्गाला संधी देणेच होतो. त्यातच ग्राम व प्रभाग दक्षता समिती शिथील झाले आहेत. मे व जून मध्ये जितका काटेकोरपणा होता तो आता राहिलेला नाही. यामुळे या समित्यांना "ऍक्‍टीव्ह' करून अद्याप कोरोना संपलेला नाही या मानसिकतेत आणावे लागणार आहे.

 

संपादन - सचिन चराटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prepared To Prevent Corona Infection New Squad Done Kolhapur Marathi News