परतीच्या पावसाने ऊस वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर

सुनील कोंडुसकर
Monday, 12 October 2020

ऑक्‍टोबर महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी अजूनही परतीचा, ढगफुटीसदृश पाऊस पडतच आहे. जमिनीतील ओलावा टिकून आहे. शेतात आणि पाणंद रस्त्यात चिखलाचे साम्राज्य असल्याने यावर्षीही ऊस वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे.

चंदगड : ऑक्‍टोबर महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी अजूनही परतीचा, ढगफुटीसदृश पाऊस पडतच आहे. जमिनीतील ओलावा टिकून आहे. शेतात आणि पाणंद रस्त्यात चिखलाचे साम्राज्य असल्याने यावर्षीही ऊस वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. परिणामी वाहतूक आणि तोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होण्याची चिन्हे आहेत. कारखान्यांनी यावर पर्याय म्हणून कर्नाटकसह रस्त्याकडेच्या ऊस तोडणीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. 

तालुक्‍यात सुमारे 10 हजार 200 हेक्‍टरवर ऊस पीक आहे. 6 लाख टनांहून अधिक उत्पादन होते. हमखास आणि हमीभाव असणारे हे पीक शेतकऱ्याला आर्थिक हातभार देते. कौटुंबिक खर्चाचे सर्व नियोजन या पिकावरच अवलंबून असते. त्यामुळे योग्य वेळेत तोडणी व्हावी यासाठी शेतकरी आग्रही असतात. आपला ऊस आधी जावा यासाठी तोडणी, वाहतूक यंत्रणेला खूश करण्याचा प्रयत्न होतो.

अनेकदा या यंत्रणा शेतकऱ्याला नागवतात; परंतु गेल्या वर्षापासून या मानवी प्रयत्नाला निसर्गानेच खीळ घातली आहे. परतीचा पाऊस ऑक्‍टोबरच्या शेवटपर्यंत सातत्याने पडतच राहतो. त्यामुळे जमिनीतील ओल कमी होत नाही. रस्त्यातही चिखलाचे साम्राज्य असल्याने तोडणी आणि वाहतूक थांबवावी लागते. यावर्षीही अजून पाऊस पडतच असल्याने तोडणी, वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा खडकाळ, मुरमाड मातीचा असल्याने तिथे लगेच रस्ते सुकतात; परंतु कर्यात भागात काळवाट जमिनीतील ओलावा लवकर कमी होत नाही. याच भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्‍यात तीन कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप केले जाते. त्यामुळे स्थानिक ऊस उचल करण्यास स्पर्धा असते. एकदा कारखाना सुरू झाल्यावर ऊस उपलब्ध न झाल्यास कारखाना बंद ठेवण्याची स्थिती उद्‌भवते; मात्र ते टाळण्याच्या दृष्टीने कारखान्यांनी नियोजन केले आहे. 

कर्नाटकातील ऊस वाहतूक करण्याचे नियोजन
पावसाने अडचण निर्माण केल्यास भागातील रस्त्याकडेच्या शेतातील तसेच कर्नाटकातील ऊस वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. 
- व्यंकटेश ज्योती, सचिव, अथर्व इंटरट्रेड कंपनी. 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problem Of Sugarcane Transportation Is Serious Kolhapur Marathi News