गुळाचा उत्पादन खर्च 36, विक्री होतेय 35 रुपयाने

The Production Cost Of Jaggery Is 36 Rupees And It Is Sold At 35 Rupees Kolhapur Marathi News
The Production Cost Of Jaggery Is 36 Rupees And It Is Sold At 35 Rupees Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : साखरेप्रमाणे गुळाला हमीभाव नसल्याने सध्या गुऱ्हाळ चालकांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. 35 रुपये किलोने गुळाची विक्री होत असताना उत्पादन खर्च मात्र प्रतिकिलो 36 रुपये येत आहे. गुऱ्हाळ चालकांना प्रतिकिलो एक रुपया कमी दराने गुळाची विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. दराची हमी नसल्याने सध्या जिल्ह्यातील चाळीस टक्के गुऱ्हाळघरे बंद करण्याची वेळ आली आहे. 

पंधरा-वीस वर्षापूर्वी जिल्ह्यात सुमारे 2200 गुऱ्हाळघरे होती. मात्र, कालांतराने उसाला हमीभावामुळे वाढत गेलेला दर, गुळाची मागणी आणि दराअभावी होणारी फरफट लक्षात घेता आज जिल्ह्यात केवळ पावणे दोनशे गुऱ्हाळ घरे आहेत. सध्या साखर मिश्रीत गुळाच्या दराची तुलनाही चांगल्या गुळाशी केली जात आहे. 

साखरेला हमीभावामुळे दराची हमी असते. त्यामुळे कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो. 86032 जातीचा ऊस गुऱ्हाळ घर चालकांकडून खरेदी केला जातो. या वर्षी कोरोनाचे कारण देत अनेक व्यापाऱ्यांकडून गुळाला मागणी नसल्याचे कारण पुढे करून चांगला गूळही कमी दराने खरेदी करण्याचा घाट घातला आहे. एक टन उसापासून 125 ते 130 किलो गूळ मिळतो. मात्र, उत्पादन खर्चाचा विचार करता यातून पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. या वर्षी विविध कारणांनी अनेक गुऱ्हाळघरे बंद करून नुकसान टाळण्याची वेळ आली आहे. 

कार्यक्रमांवरील बंदीचाही फटका 
कोरोनामुळे जिल्ह्यातील यात्रा, जत्रा, उरूस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे गावागावांतील महाप्रसादाच्या कार्यक्रम बंद राहिल्याने गुळाच्या मागणीत घट झाली आहे. ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत असल्याने गतवर्षीप्रमाणे या वर्षीही गुळाची मागणी कमी झाली आहे. 

नफ्याचा ताळमेळ कठीण
गुळाला हमीभाव नसल्याने गुऱ्हाळघर चालकांना उत्पादन खर्च आणि नफ्याचा ताळमेळ घालणे कठीण बनले आहे. विविध समस्यांना तोंड देताना हा व्यवसाय नुकसानीत आला असून शासनाने गुऱ्हाळ चालकांच्या व्यथा जाणून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. 

- अभिजित चौगुले, गुऱ्हाळ चालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com