जवानाला थर्ड डिग्री देणे पोलिस उपनिरीक्षकांना पडले चांगलेच महागात

psi suspended because case of use of third degree
psi suspended because case of use of third degree

चिक्कोडी - एकसंबा येथे तोंडाला मास्क न लावता घराबाहेर असलेल्या सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या कमांडोला मारहाण करणे, अनवाणी फिरविणे, साखळदंडाने बांधून ठेवणे व थर्ड डिग्रीचा वापर केल्याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांना जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी निलंबित केले. तशी माहिती त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे बुधवारी दिली. संशयित आरोपीशी गैरवर्तन करणे व झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

एकसंबा येथील सचिन सावंत हा कमांडो सीआरपीएफ दलातील कोब्रा बटालियनमध्ये असून तो सुट्टीवर आला होता. 23 एप्रिल रोजी घरासमोर दुचाकी धुत असताना तोंडाला मास्क घातला नसल्याच्या कारणावरुन सदलगा पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराने त्याला मारहाण करुन अनवाणी नेऊन पोलिस ठाण्यात साखळदंडाने बांधून ठेवले होते. तो फोटो व्हायरल झाल्याने पोलिसांवर राज्यभरातून असंतोष व्यक्त करण्यात येत होता. 

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलिस महासंचालकांनी पोलिसांच्या या चुकीच्या वर्तनाची चौकशी करण्याचे आदेश बजावले होते. मंगळवारी सावंत यांना सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता सावंत यांच्यावर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस अधीक्षकांनी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांना निलंबित केले आहे. 

कालपर्यंत पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करणाऱ्या पोलिस अधीक्षकांना पोलिसांनी गैरवर्तन केल्याचे दिसून आल्याने त्यांनी ही कारवाई केली. तसेच या प्रकरणाचा तपास येथेच बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून कमांडोवर थर्ड डिग्रीचा वापर केल्याच्या प्रकारावर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षकांवर टीकेची झोड उठवली जात होती. यानंतर बुधवारी अधीक्षकांनी उपनिरीक्षकाला निलंबित केल्याचा आदेश बजावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com