
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या ग्रंथ महोत्सवात देशभरातील अनेक मान्यवर प्रकाशकांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवातील स्टॉलवर अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या संदर्भग्रंथांसह महत्त्वाच्या अवांतर वाचनासाठीही हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 56 व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यंदा ग्रंथ प्रदर्शनाचे चौदावे वर्ष आहे. प्रदर्शनात सुमारे 33 स्टॉल मांडले आहेत.
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या छायाचित्रांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते अभिवादन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही. थोरात, इंटरनेट विभागाचे समन्वयक डॉ. मिलींद जोशी, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एन.एम. आकुलवार, सहाय्यक कुलसचिव निवास माने आदी उपस्थित होते.
ट्रेड फेअर स्टार्ट-अप
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग व व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळावेत आणि त्यांच्यातून चांगले उद्योजक-व्यावसायिक घडावेत, यासाठी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठीही काही स्टॉल घेऊन त्यांचे कौशल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते. यंदाही या उपक्रमाची व्याप्ती वाढवून कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राने एमबीए युनिटच्या सहकार्याने ट्रेड फेअर स्टार्टअपचे आयोजन केले आहे. याअंतर्गत एकूण 10 स्टॉल घेतले असून त्यातील आठ विविध खाद्यपदार्थांचे तर सेंद्रिय गूळ आणि कोल्हापुरी चप्पलचा प्रत्येकी एक स्टॉल आहे. यात एमबीए, कॉमर्स, रसायनशास्त्र आणि फूड टेक्नॉलॉजीच्या सुमारे 40 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या फेअरचे नियोजन समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, श्रीमती डॉ. इंगवले व कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण यांनी केले आहे.
"गीत-बहार'ला जल्लोषी प्रतिसाद
ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर "गीत-बहार' या विद्यार्थ्यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन झाले. सिद्धराज पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याने साऱ्यांचीच मने जिंकली. णवत्तेला कोणत्याही मर्यादा नसतात. शारिरीक अगर अन्य कोणतेही व्यंग तुमच्या अभिव्यक्तीमधील अडथळा ठरू शकत नाही, हे सिद्धराजने खऱ्या अर्थाने सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
सिद्धराज पाटील याच्यासह गीता रणवाडकर, विनायक लोहार, हर्षदा परीट, भावना हांडे, रोहित कांबळे यांचा समावेश होता. त्यांना अमित साळोखे, ओंकार गुरव, विक्रम परीट, संदेश कायंदे यांनी अतिशय उत्कृष्ट संगीतसाथ केली. आदित्य मैंदर्गीकर यांनी निवेदन केले. या कार्यक्रमानंतर संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्याच विद्यार्थ्यांनी "शिरियल फिरियल' ही लघुनाटिका सादर केली. विभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि निखील भगत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.