उपजिल्हाधिकारी धावले पुणेस्थित गावकऱ्यांच्या मदतीला...वाचा चंदगडवासियांना असे लाभले दातृत्व

दीपक कालकुंद्रीकर
Wednesday, 12 August 2020

मुंबईपाठोपाठ पुणे येथे चंदगड तालुक्‍यातून नोकरीसाठी गेलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. येथील हजारो लोक बांधकाम, हॉटेल, वाहतूक, कार्यालये येथे काम करून आपल्या कुटुंबाची व गावी असलेल्या लोकांची जबाबदारी पेलतात.

कुदनूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची गैरसोय झाली. बाहेरून नोकरीसाठी आलेल्या व भाड्याने राहणाऱ्या लोकांचेही हाल झाले. अशीच काहीशी परिस्थिती चंदगड तालुक्‍यातून नोकरीसाठी पुण्याला गेलेल्या लोकांची झाली होती. याची दखल घेत मूळचे कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी व पुणे येथील उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी संवेदनशीलता दाखवत चंदगड तालुका मित्रमंडळाच्या सहकार्याने चंदगड तालुक्‍यातून पुणे येथे नोकरीनिमित्त आलेल्या 110 कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप केले. 

मुंबईपाठोपाठ पुणे येथे चंदगड तालुक्‍यातून नोकरीसाठी गेलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. येथील हजारो लोक बांधकाम, हॉटेल, वाहतूक, कार्यालये येथे काम करून आपल्या कुटुंबाची व गावी असलेल्या लोकांची जबाबदारी पेलतात. पण, कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळित झाले. चंदगड तालुक्‍यातील अशा शेकडो कुटुंबांना याचा फटका बसला.

याची दखल घेत उपजिल्हाधिकारी पाटील यांनी चंदगड तालुक्‍यासह आजरा व सिंधुदुर्ग येथील एकूण 110 कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप केले.याकामी त्यांना चंदगड तालुका मित्रमंडळाचे संघटक प्रमुख लक्ष्मण सावंत, राजेंद्र गावडे, अशोक पाटील, संजय पाटील, गोविंद गावडे यांचे सहकार्य लाभले. संजय पाटील यांनी अडचणीच्या काळात केलेल्या मदतीबद्दल सगळ्या कुटुंबांनी व चंदगड तालुका मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

भविष्यात अडचण आल्यास ठामपणे पाठीशी
लॉकडाउन काळात कष्टकरी लोकांना त्रास सहन करावा लागला. सामाजिक बांधिलकीपोटी आपल्या तालुक्‍यातील या लोकांना ही छोटीशी मदत केल्याचा आनंद आहे. भविष्यात अशी काही अडचण आल्यास आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी राहू. 
- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Based Villagers Helped The Deputy Collector Kolhapur Marathi News