देशमुख विरुध्द लाड: बहुरंगी लढतीत सांगली ‘पदवीधर’चे कुरूक्षेत्र

Pune Graduate Constituency Election informative news by shekhar joshi
Pune Graduate Constituency Election informative news by shekhar joshi

सांगली : पदवीधर मतदारसंघाच्या मैदानातील दोन्ही बलाढ्य उमेदवार एकाच जिल्ह्यातील किंबहुना एकाच कडेगाव-पलूस या मतदारसंघातील असे इतिहासात पहिल्यांदाच घडतंय! खरे तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा काही अपवाद वगळता भाजपचा अभेद्य गड राहिला आहे; पण यावेळी या मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीतील सत्तास्पर्धेतून अनपेक्षितपणे अत्यंत चुरशीकडे नेली आहे. अन्य पक्षांचे उमेदवारदेखील यावेळी रिंगणात असल्याने लढत बहुरंगी असली तरी खरे युद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असेच असणार आहे.

विविध निवडणुकांच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसतो आहे तर राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतदेखील अमाप उत्साह आहे, अर्थात काँग्रेसची साथ ते कशी मिळवतात हे देखील महत्त्वाचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ विधानसभा आणि साडेनऊ लोकसभा मतदारसंघाचा विस्तार या मतदारसंघाचा आहे. जनता दलाचे शरद पाटील वगळता गेल्या तीस वर्षांत भाजपकडेच 
राहिला आहे.

जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा भाजपकडून ही निवडणूक जिंकली आहे. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ आपल्याच पक्षासाठी काबीज करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात पुढील पंधरा दिवस पश्‍चिम महाराष्ट्रात युध्द जुंपणार आहे. दोन्ही बाजूनी उमेदवार म्हणून अनेक नावे आली तरी भाजपला विनिंग मेरीट दिसले ते संग्रामसिंह देशमुख यांच्यातच! त्यामुळे पहिल्यांदाच संघाच्या कोअर टिमच्या बाहेरचा उमेदवार त्यांनी उतरवला आहे. राष्ट्रवादीकडूनदेखील अनके नार्वे चर्चेत राहिली पण अरुण लाड यांचेच नाव आघाडीवर होते त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी मिळाली.

खरे तर याचे संकेत शरद पवार यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र राष्ट्रवादीच्या आधी भाजपने संग्राम यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीला पेचात टाकले होते. पण राष्ट्रवादीने लाड यांनाच फलंदाजीला उतरवत पदवीधरची झुंज एकाच विधानसभा मतदारसंघात लावून दिली आहे. शिक्षण संस्था, विविध जात समुह यांचे नेटवर्क अनेकवर्षे भाजपने तयार केले आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने पश्‍चिम महाराष्ट्रातील ताकदीच्या बळावर आपलेही असेच नेटवर्क तयार केले आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग यांच्यासमोर चंद्रकांत पाटील निसटत्या फरकाने जिंकले होते. त्यावेळी लाड यांनी ३७ हजार मते घेत केलेली बंडखोरीच चंद्रकांतदादांच्या पथ्यावर पडली होती. आता राष्ट्रवादीला सारंग पाटील व लाड यांच्या मतांची बेरीज करु शकते का? हा सर्वात कळीचा मुद्दा असेल. मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार हेही महत्त्वाचे असेल. यावेळीदेखील जनता दलाकडून शरद पाटील, भाकपकडून शंकर पुजारी, आपकडून अमोल पवार, श्रीमंत कोकाटे (अपक्ष) असे रिंगणात आहेत. ही लढत बहुरंगी असेल. राष्ट्रवादीसाठी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, सत्याजित पाटील, हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील या चार मंत्र्यांची मोठी फौज असेल. भारती विद्यापीठ, डीवायपाटील विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था असे पाठबळ आहे. तेच भाजपकडेदेखील संघाचे व शिक्षण संस्थांचे नेटवर्क आहे. पुण्यातील त्यांचे भक्कम नेटवर्कवरच संग्राम यांची भिस्त असेल.

प्रदेशाध्यक्षांचे होमपीच...
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आक्रमक नेत्यांचे तालुके म्हणून कडेगाव-पलूसची ओळख आहे. पण गंमत अशी आहे की, देशमुख-लाड हे मात्र परस्परांचे चांगले मित्र म्हणून जिल्ह्याला ओळख आहे. तथापि भाजप आणि राष्ट्रवादीत मात्र या निवडणुकीवरून मोठा संघर्ष धुमसतो आहे. जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांचे हे होमपीच आहे. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com