राधानगरी धरणाची गळती  निघणार पावसाळ्यापूर्वी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : राधानगरी धरणाला असलेल्या दोन ठिकाणची गळती काढणे आणि मुख्य गेट दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव नुकताच नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून हा प्रस्ताव सादर केला असून, सुमारे 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने मंजूर होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम होण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : राधानगरी धरणाला असलेल्या दोन ठिकाणची गळती काढणे आणि मुख्य गेट दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव नुकताच नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून हा प्रस्ताव सादर केला असून, सुमारे 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने मंजूर होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम होण्याची शक्‍यता आहे. 

गतवर्षी गळतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले. यामुळे अख्खे गाव वाहून गेल्याची घटना राज्यभर गाजली. यानंतर राज्यातील सर्वच धरणांचे ऑडिटपासून छोट्या-मोठ्या गळतीचा विषय अजेंड्यावर आला. गतवर्षी झालेली घटना पुन्हा घडू नये, यासाठी उन्हाळ्यातच सर्व धरणांची गळती काढण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. "डीआरआयपी'मधून निधी मागितला जाणार आहे. 

केंद्र सरकारकडून हा निधी मिळणार आहे. महिन्यापूर्वी राधानगरी धरणाला विशेष पथकाने भेट दिली आहे. यातून येथील गळती काढणे आणि मुख्य दरवाजा दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार येथील पाटबंधारे विभागाने 56 पानांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला. यात धरणासाठी असलेल्या गळतींसह धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती करण्याचे सुचविले आहे. 

नाशिकमधील बैठकीनुसार प्रस्ताव तातडीने मंजूर होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे. थेट केंद्र शासनाकडून हा निधी उपलब्ध होणार असून, हा निधी मार्चअखेर मिळाल्यास एप्रिल मेमध्ये गळतीचे काम पूर्ण होऊ शकते. याचबरोबर जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी धरणे, बंधारे यांच्याही डागडुजीला निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. 

दुरुस्तीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये 
गळती काढण्यासाठी सुमारे पाच कोटी आणि गेट दुरुस्तीसाठी साधारण पाच कोटींचा निधी आवश्‍यक आहे. हा निधी तातडीने उपलब्ध झाल्यास उन्हाळ्यापूर्वीच ही दुरुस्ती पूर्ण केली जाईल. त्यामुळे पावसाळ्यात होणारा धोका टाळता येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. म्हणून किमान येत्या पावसाळ्यापूर्वीच धरणांची डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhanagari dam leakage will go out before monsoon