शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचा कट यशस्वी होऊ देणार नाही ; माजी खासदार राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

. कायदे करताना व्यापक चर्चा टाळून मंजुरीचा केवळ फार्स केला गेला.

इचलकरंजी : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचा व्यापक कट आहे, तो आम्ही शेतकरी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मांडली. इचलकरंजी येथील आंतरभारती विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल, नालंदा अकादमी यांच्यावतीने आयोजित संविधान जागर व्याख्यानमालेत राजू शेट्टी यांची मुलाखत डॉ. महावीर अक्कोळे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ऋचिता पाटील यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. श्री. शेट्टी म्हणाले, "स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव ठरवताना शेतकऱ्याची शेतीतील मूलभूत गुंतवणूक, शेतकऱ्याच्या कुटुंबाचे श्रम, पीक घेताना होणारा खर्च आणि त्यावर आवश्‍यक नफा या सर्वांचा विचार करून सरकारने हमीभाव दिला पाहिजे. अशी प्रमुख मागणी देशातील तमाम शेतकरी संघटना सातत्याने करत आहेत. याचा कसलाही विचार न करता जे शेतकऱ्यांनी कधीच मगितले नाही असे कायदे केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादले आहेत. कायदे करताना व्यापक चर्चा टाळून मंजुरीचा केवळ फार्स केला गेला. कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंगच्या नावाखाली नेहमीच भवितव्य असणारी शेती बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव या कायद्यांनी आखला आहे. शेतीतील धस्कट जळणाऱ्या शेतकऱ्याला या कायद्यानुसार एक कोटी रुपये दंड आणि 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अशा भयंकर तरतुदी आहेत.' '

हे पण वाचा - चिप्स खाल्याने रंकाळ्यातील पाणबदकांचा मृत्यू

विनायक चव्हाण यांनी स्वागत केले. सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. संजय रेंदाळकर यांनी परिचय करून दिला. एम. डी. पाटील यांनी आभार मानले. सुत्रसंचालन विभावरी नकाते यांनी केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raju shetty speech ichalkaranji