झेंडू उत्पादकांवर फुले टाकून देण्याची वेळ 

ऋषीकेश राऊत
Monday, 16 November 2020

दसऱ्यात अच्छे दिन आलेल्या झेंडूला दिवाळीत मात्र बुरे दिन आल्याचे चित्र पहायला मिळाले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू दाखल झाला.

इचलकरंजी : दसऱ्यात अच्छे दिन आलेल्या झेंडूला दिवाळीत मात्र बुरे दिन आल्याचे चित्र पहायला मिळाले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू दाखल झाला. दसऱ्याच्या आशेने दिवाळीत झेंडू फुल विक्रेत्यांची संख्या वाढल्याने याचा परिणाम झेंडूच्या दरावर झाला. आवक वाढल्याने जादा दराच्या अपेक्षाचा भंग होत शेतकरी, विक्रेत्यांचे नियोजन फसले आहे. 

दसऱ्याला विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी स्थिरावले होते. दसऱ्याच्या बाजारात शेतकरी वगळता इतर झेंडू विक्रेते व व्यापाऱ्यांची संख्या दुर्मिळ होती. त्यामुळे प्रतिकिलो 250 ते 300 रूपयेपर्यंत मिळालेल्या झेंडूच्या दरामुळे शेतकरी मालामाल झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना योग्य नियोजनाची कास धरल्याने झेंडूचे चांगले उत्पादनही मिळाले होते. बाजारातही दसऱ्याला फुलांची आवक कमी प्रमाणात झाल्याने झेंडूला तेजी आली होती. याचा परिपूर्ण फायदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना झाला. अवकाळी पावसामुळे कमी उत्पादन झाल्याने कर्नाटक राज्यातूनही झेंडू बाजारात येऊ शकला नाही. त्यामुळेच उपलब्ध झेंडूने विक्रमी भाव मिळवत उत्पादकांना अच्छे दिन आले. 

दसऱ्यानंतर काही दिवसांवर आलेल्या दिवाळीत मात्र झेंडूमुळे आर्थिक लाभाची अपेक्षा भंग पावली. झेंडूच्या विक्रीचा अंदाज फसल्याने दिवाळीच्या बाजारात झेंडू फेकून देण्याची वेळ आली. लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवसापर्यंत झेंडू उत्पादक, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलेल्या झेंडूने लक्ष्मी पूजनादिवशी मात्र निराशा आणली. 200 वरून थेट 30 ते 40 रूपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री करावी लागली. दसऱ्याला कमी आवकमुळे दर मिळाला. तर दिवाळीला जास्त आवकमुळे दर पडल्याचे स्पष्ट होते. 

बाजार समितीत दर पडले 
दिवाळीच्या आधीचा काळ झेंडू फुल उत्पादकांसाठी सुगीचा होता. सध्या बाजार समितीत झेंडू फुलाचे सौदे उत्पादकांसाठी निराशाजनक आहेत. 200 ते 300 च्या दरम्यान प्रतिकिलो सौद्यात निघणारे भाव 40 रूपयांवर आले आहेत. अचानक वाढलेली आवक याला मारक ठरली आहे. 

दर खूपच खालावला
अवकाळीचा फटका बसल्याने योग्य नियोजनाने दसऱ्याला चांगले उत्पादन होऊन झेंडूला चांगला भाव मिळाला. दिवाळीतही हीच अपेक्षा असताना बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक वाढली. तरी देखील चांगला दर मिळण्याची चिन्हे दिसत असताना झेंडूचा दर खूपच खालावला. 
- रमीज दानवाडे, फुल उत्पादक 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Rate Of Marigold Flowers Fell Kolhapur Marathi News