व्हिडीओ : गरीब मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे म्हणजे...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीकरिता विशेष निमंत्रित म्हणून संभाजीराजे सहभागी झाले.

कोल्हापूर - गरीब मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे, हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार पुढे नेण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे दिली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीकरिता विशेष निमंत्रित म्हणून संभाजीराजे सहभागी झाले. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संभाजीराजे म्हणाले, "यापूर्वीच्या सुनावणीला मी दिल्लीत उपस्थित होतो. आज ऑनलाईन सुनावणीला कोल्हापुरातून सहभागी झालो. अनेक प्रश्‍नांवर समर्थक-विरोधकांनी चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर चर्चा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे म्हटले आहे. न्यायालयाने वकिलांना मुद्दे लेखी स्वरूपात देण्यास सांगितले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अंतिम ऑर्डरविषयी पुढच्या बुधवारी चर्चा होणार आहे.''

पुढे ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मी वंशज आहे. अठरापगड जाती-धर्मातील लोकांना एकत्र करून त्यांचा विकास घडवणे, हे माझे कर्तव्य आहे. सर्व जाती-धर्मातील सुख दु:खात एकत्र नांदायला हवेत, ही माझी भूमिका आहे. शाहू महाराजांनी 1902 ला अन्य जातींसह मराठा समाजालादेखील आरक्षण दिले होते. आज गरीब मराठा समाजाची स्थिती हलाखीची आहे. सोशल बॅकवर्डमध्ये त्यांचा समावेश होतो. शिक्षण व नोकरीत समाजाला आरक्षणाची आवश्‍यकता आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of sambhajiraje on the hearing Maratha reservation was held in the Supreme Court through video conference