जेष्ठ तुलनाकार डॉ.आनंद पाटील सरांचा संचारबंदीतला असा हा सार्थकी दिनक्रम... 

संदीप खांडेकर
Friday, 3 April 2020

डॉ.‌ आनंद पाटील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ तुलनाकार. मूळचे ‌शाहूवाडीतल्या शित्तूर तर्फ मलकापूरचे. गोवेकर पाटील म्हणून ओळख सांगण्यात ते कचवचत नाहीत. गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे ते माजी विभागप्रमुख. पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ यंदा त्यांच्या गळ्यात पडली. सत्कार सोहळे सुरू असतानाच कोरोनाने पालथ्या घड्यावर पाणी फिरवले. गजर न लावताच पहाटे चारला ते उठतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ते‌ विद्यार्थी. कमवा व शिका योजनेत त्यांनी घाम ‌गाळला.‌ त्याची बीजे त्यांच्या अंगात आजही तग धरून आहेत. दोन वेळा दहा दिवसीय विपश्यना शिबिर केल्याने त्यांची दिवसभरात दोन वेळा विपश्यना चुकत नाही. 

डॉ. पाटील सर इंग्रजी विषयाचे प्राध्यापक. माय मराठीशी त्यांची नाळ तुटलेली नाही. इंग्रजीतील बारा, मराठीतील पस्तीस पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. राज्यस्तरीय चार पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठासह भारतातील १२० विद्यापीठांत त्यांची तुलनात्मक साहित्यातील पुस्तके अभ्यासक्रमास आहेत. वाचन व लेखनाचा सरांना दांडगा व्यासंग. रोखठोक व परखड मते व्यक्त करण्यात सर फेमस आहेत. सात हजारांवर पुस्तकांच्या कबिल्यात रमण्यात त्यांचा दिवस सरतो. सरांच्या खोलीत पाऊल ठेवल्यावर 'सर काय लिहिताय?,' प्रश्नावर संस्कृती अभ्यास प्रकल्पाची हस्तलिखिते सरांनी दाखवली. 

पहाटे चारला उठून सर विपश्यनेत अर्धा तास स्तब्ध राहतात. साडे सातला नाश्ता झाल्यावर लेखन, वाचन, संशोधनात सरांच्या विचारांची चाकं गतीमान होतात. रोज ‌वीस पाने लिहिली पाहिजेत, हे सरांच तत्त्व. विशिष्ट लेखन स्वतः टाईप केल्याशिवाय नोबेल पुरस्कार विजेता हेमींग्वे जेवण घेत नसे. सर त्याच्या वाटेवरचेच वारकरी. दहा वाजता जेवण करून पुन्हा वाचनात सर गढून जातात. वंदीड तास विश्रांतीनंतर ‌लेखन प्रपंच सुरू होतो. टी. व्ही.वरील बातम्या पाहून पुन्हा जेवण व रात्री दहा वाजता झोपणे, यात ‌खंड पडत नाही. 

संचारबंदी सकारात्मक घेऊन सर व्यस्त आहेत. 'सांस्कृतिक मीमांसेचा पहिला खंड तयार होत आलाय. रेमंड विल्यम्सने ‌संस्कृती‌ शब्दावर सहा पुस्तके लिहिली आहेत. शेतकऱ्याचा हा मुलगा. माझा आदर्श. त्याचे 'कि वर्डस इन कल्चरल स्टडीज,'‌ बारकरचे 'सेज डिक्शनरी ऑफ कल्चर,' दुर्गा भागवत यांचे 'संस्कृती संचित,' टाॅम बाॅटमोरचे  'डिक्शनरी ऑफ मार्कसिस्ट थाॅट,' पुस्तकांतील संदर्भ चाळतोय. अडोरनोचे 'कल्चरल इंडस्ट्री' पुस्तक ‌महत्त्वपूर्ण आहे,' सरांचा वाचनाचा व्यासंग प्रकटला. 

भारतीय लेखक रमेश कुणबा यांचे 'कल्चर अंण्ड सिव्हिलायझेशन' तेही सरांच्या हाताशी होते. ते दाखवून सरांचा तुलनात्मक विश्लेषणाचा गियर टाकला. नोबेल पुरस्कार विजेते जुजेस‌ सारामागो यांच्या कादंबरीवर आधारित 'ब्लाईंडनेस' चित्रपटावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरांनी लेख लिहिणार असल्याचे सांगितले. 'अज्ञानाचे उत्पादन थांबवण्यासाठी बहुभाषिक पुस्तके उतारे आहेत. सुलभीकरणाच्या शापात अडकलेल्यांना बाहेर पडण्यासाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे,' असे त्यांनी आवर्जून सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remarkable routine of dr Anand Patil sir