
उत्तूर : त्यांचे वय 83...तरीही डोळ्यांवर चष्मा नाही. शिलाई मशिनचा छोटा पार्टही त्यांना सहज दिसतो. ते शुद्ध शाकाहारी आहेत. रक्तदाब, साखर असा कुठालाच आजार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनच्या काळात 80 शिलाई मशिन दुरुस्तीचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला. शिलाई मशिनचे डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय आहे. या अवलीयांचे नाव आहे प्रभाकर बळवंत बेडगे. उत्तूर (ता. आजरा) येथे ते गेली 40 वर्षे शिलाई मशिन दुरुस्तीचे काम करतात.
पन्नास वर्षांपूर्वी निपाणीहून कै. गोविंद धंदले हे उत्तूरला शिलाई मशिन दुरुस्त करायला यायचे. ते दुरुस्त करताना बेडगे यांनी निरीक्षण केले व ते दुरुस्तीचे काम शिकले. त्या काळी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे सायकलला पिशवी अडकवायची व गावोगावी जाऊन शिलाई मशिन दुरुस्त करायची. मशिन दुरुस्त झाल्यावर एक पैसा (आणा) मिळायचा. दुरुस्ती करून घेणारे कधी कधी जेवण द्यायचे. जवळपासच्या तीन तालुक्यांत त्यांचे दुरुस्तीचे काम चालायचे.
त्या काळी असलेल्या चेनवर चालणाऱ्या, धोट्यावर चालणाऱ्या मशिन त्यांनी दुरुस्त केल्या आहेत. या मशिन बंद झाल्या आणि गिअरवर चालणाऱ्या मशिन आल्या. सर्व प्रकारच्या मशिन दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मशिन दुरुस्त करताना पार्ट मोडणार नाहीत याची व ग्राहकांची कमीत कमी खर्चात मशिन दुरुस्त व्हावीत म्हणून ते काळजी घेतात.
अनेकांच्या शिलाई मशिन धूळ खात पडल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार थांबले. अशा वेळी विशेषतः महिला घर खर्च चालविण्यासाठी पुढे आल्या. खराब मशिन दुरुस्त करण्याचे काम बेडगे यांच्याकडे आले. त्यांनी या मशिन दुरुस्त करून दिल्या. त्यामुळे घरात कपडे शिवून देऊन अनेक महिलांना रोजगार मिळाला. काहींनी मास्क शिवून दिले. त्यामुळे कोरोनासारखी महामारी रोखण्यास बेडगे यांचा हातभार लागला.
बेडगे यांना व्यायामाची व वाचनाची आवड आहे. आजही दररोज तीन किमी. ते चालतात. दररोज सकाळी सहा वाजता घरापासून 1 किमीवर असलेल्या पेपर स्टॉलवर ते चालत जातात. एक तास सर्व वृत्तपत्रे वाचतात. त्यांना वृत्तपत्रांच्या कात्रण संग्रहाचा छंद आहे.
खर्चाला हातभार लावता आला
लॉकडाउनमध्ये कॉलेज बंद झाले. घरातून बाहेर जाता येईना. यावेळी घरात ठेवलेली पूर्वीची शिलाई मशिनची आठवण झाली. ही मशिन पार गंजून गेली होती. दुरुस्त होणार नाही अशी स्थिती होती; मात्र बेडगे यांनी ती दुरुस्त करून दिली. त्यामुळे गावातील महिलांच्या शिलाईचे काम मिळाले. घर खर्चाला हातभार लावता आला.
- पूजा पाटकर, कॉलेज युवती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.