esakal | मजुरांच्या आरोग्याची जबाबदारी कारखान्यांच्या खांद्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

The Responsibility For The Health Of The Workers Lies With The Sugar Factories Kolhapur Marathi News

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या गळीत हंगामात साखर कारखान्यांसमोर अनेक आव्हाने उभे ठाकले असतानाच आता नव्याने आणखीन एक जबाबदारी खांद्यावर आली आहे.

मजुरांच्या आरोग्याची जबाबदारी कारखान्यांच्या खांद्यावर

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या गळीत हंगामात साखर कारखान्यांसमोर अनेक आव्हाने उभे ठाकले असतानाच आता नव्याने आणखीन एक जबाबदारी खांद्यावर आली आहे. बीडमधून येणाऱ्या प्रत्येक ऊस तोड मजुरांचे "केअर टेकर' (काळजी वाहक) म्हणुन कारखान्यांना काम करावे लागणार आहे. मजूर बीडला माघारी जाईपर्यंत त्यांची तपासणी आणि उपचाराचीही जबाबदारी पेलावी लागणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांना स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे. साखर संचालकांनी तशा मार्गदर्शक सूचना कारखान्यांना बैठकीत केल्या आहेत. 

कोरोनामुळे यंदा बीडच्या टोळ्या येतील की, नाही याबाबत संभ्रम आहे. यामुळे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी बीडमध्ये जावून टोळ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यावरून कोरोना असला तरी किमान 90 टक्केहून अधिक टोळ्या दाखल होतील, असा अंदाज बांधला जात आहे. हे दिलासादायक चित्र कारखान्यांना सुखावणारे असले तरी दुसऱ्या बाजूला या टोळ्यांमधील प्रत्येक मजुरांची काळजी घेण्याची जबाबदारीही कारखान्यांच्या खांद्यावर येवून पडली आहे. 

रोज प्रत्येक कामगाराचा ताप, ऑक्‍सीजन मोजावे लागणार आहे. मजुरांच्या नावानीशी त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. या नोंदी शासकीय यंत्रणेला कळवावी लागणार आहे. लक्षणे आढळल्यानंतर त्या मजुरावर उपचार करण्यासाठीही कारखान्यांनीच पुढाकार घ्यावयाचा आहे. कोरोना बाधित असलेल्या मजुराला तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करावयाचे आहे. प्रत्येक मजुराला सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मजुरांच्या पाली उभारण्यात येतात, ते ठिकाणही कारखाना व्यवस्थापनाने पहावयाचे आहे.

तेथे पाणी, शौचाची व्यवस्था करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळाद्वारे कोरोना लढ्यात कार्यरत आहे. यामुळे मजुरांच्या तपासणीची आणि उपचाराची सर्व जबाबदारी कारखान्यांना सांभाळावी लागण्याच्या सूचना आहेत. त्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेशही दिले आहेत. हे आव्हान आता कारखाने कसे पेलतात, हेच पहावे लागेल. 

समिती कार्यान्वित होणार 
तपासणी व उपचाराचे नियोजन करण्यासाठी समिती नेमण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. त्यात डॉक्‍टरांसह कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तपासणीच्या नोंदी संकलीत करून ती शासन यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमावा लागणार आहे. शेती गटनिहाय दाखल मजुरांची तपासणी करण्याची जबाबदारी शेती विभागाकडे फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्याचे कारखान्यांचे नियोजन आहे. 

संपादन - सचिन चराटी