चाकरमान्यांसाठी धावले निवृत्त पोलिस उपअधीक्षक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

पेरीड (ता. शाहूवाडी) येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी शाहूवाडी, शिराळा व पन्हाळा तालुक्‍यातील मुंबईस्थित सुमारे साडेसहाशे चाकरमान्यांना धान्य व जीवनावश्‍यक वस्तू पोहोच करण्याची व्यवस्था करून बांधिलकी जपली. याबाबत सर्व परवानग्या काढल्या असून मुंबई व पुण्यात तेवीस ठिकाणी हे साहित्य पोहोचविले जाणार आहे. 

शाहूवाडी : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी शाहूवाडी, शिराळा व पन्हाळा तालुक्‍यातील मुंबईस्थित सुमारे साडेसहाशे चाकरमान्यांना धान्य व जीवनावश्‍यक वस्तू पोहोच करण्याची व्यवस्था करून बांधिलकी जपली. याबाबत सर्व परवानग्या काढल्या असून मुंबई व पुण्यात तेवीस ठिकाणी हे साहित्य पोहोचविले जाणार आहे. 

मुंबई, पुण्यात शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्‍यांतील अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत. घराबाहेर जाणे नाही आणि घरात बाजार नाही, अशा बिकट अवस्थेत सर्व जण राहिले. या मुंबईस्थित गावकऱ्यांना गावाहून थेट धान्य व इतर साहित्य पाठवण्याचा निर्णय पेरीड येथील निवृत्त पोलिस उपअधीक्षक बाजीराव पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक व माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील बंधूंनी घेतला. त्यासाठी त्यांनी या तिन्ही तालुक्‍यांतील लोकांशी व्हॉट्‌सऍपद्वारे संपर्क साधून धान्य व इतर जीवनावश्‍यक वस्तू व मुंबईस्थित नातेवाईकांचे पत्ते देण्याचे आवाहन केले. त्याला लोकांनी मोठी साथ दिली.

मलकापूर येथे सर्वांनी साहित्य जमा केले. शासनाच्या परवानग्या काढून हे सर्व साहित्य ट्रकमधून पुण्यामुंबईला पाठवण्यात आले. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, दत्ता भोसले, गजानन पाटील, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप केसरे आदींनीही परिश्रम घेतले. 

लग्नसोहळ्यासाठी विनामूल्य हॉल 
दरम्यान, बाजीराव पाटील यांनी शासनाची परवानगी घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही, अशा प्रकारे तालुक्‍यातील विवाह ठरलेल्या कुटुंबांसाठी आपल्या हॉटेलमधील हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. विवाह इच्छुकांनी पूर्ण खबरदारी व काळजी घेऊन शासनाच्या परवानगीनुसार त्या ठिकाणी लग्नसोहळा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

लॉकडाउनने गावकऱ्यांचे हाल
पोलिस अधिकारी म्हणून मी मुंबईत काम केले आहे. त्यामुळे गावाकडील लोकांचे मुंबईत काय हाल होतात हे माहीत आहे. लॉकडाउनने तर या गावकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे कळले. त्यातून हे सुचले आणि सर्वांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. 
- बाजीराव पाटील, निवृत्त पोलिस उपअधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Deputy Superintendent Of Police Help For Servants Kolhapur Marathi News