त्यांना 'करोना' झाल्याची आवई उठविण्यात आली अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

"करोना" सारख्या महाभयंकर साथीने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगाची मती गुंग झाली असताना ग्रामीण भागात याचे गांभीर्य लोकांना समजलेच नाही.

सांगली - "करोना" सारख्या महाभयंकर साथीने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगाची मती गुंग झाली असताना ग्रामीण भागात याचे गांभीर्य लोकांना समजलेच नाही. किंबहुना समजलेले लोक इतरांना गांभीर्य पटवून देण्याऐवजी "करोना" वर विनोद करीत आहेत.

"करोना" प्रादुर्भाव जगभर पसरत असताना व त्याच्या परिणामांची व्याप्ती सर्वदूर होत असतानाच 15 दिवसांपूर्वी एक महिला देवदर्शन करुन परदेशातून पोहचल्या. त्यानंतर त्या किरकोळ अंगदुखीने त्रस्त होत्या याची माहिती मिळताच त्याना "करोना" झाल्याची आवई उठविण्यात आली होती. सदर महिलेस या आवईचा खूप मनस्ताप सोसावा लागत होता.

काही लोकं whatsapp द्वारे प्रबोधन, माहिती व बातम्या पोहचविण्याचा प्रयत्न करीत असताना काहीजण "जोक्स" व राजकिय पोस्ट टाकण्यात मश्गूल आहेत. कितीही समजवल तरी दिनचर्या जैसे थे आहे. परवा पोलिसांना जबरदस्तीने बाजार बंद करावा लागला तसेच हाँटेल्स, भेळसेंटर, वडापाववाले, आईस्क्रीमवाले अशा नियमित गर्दी होणाऱ्या ठिकाणांना पोलिसांनी काल नोटीसा बजावून बंद करण्यास भाग पाडले. अद्यापही काही चौकात लोक गर्दी करुन गप्पा मारत आहेत. तसेच परगांवी असणारे लोक गावात येतात आणि जातातही. तसेच आसपासच्या गावचे लोकही "आओ जाओ घर तुम्हारां" या अविर्भावात बिनधास्तपणे वांगीला येत - जात आहेत.

गावातील कुणीही ग्लोव्हज, मास्क वापरीत नाही. पुणे, मुंबई कर सूट्टीत गावाकडे परतत असताना त्यांच्याबाबतीत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग बिनधास्त आहे. सगळ्याच बाबी कायद्याने आणि शासनाने करण्यापेक्षा प्राथमिक अवस्थेत गंभीर "करोना"ला रोखण्याची जबाबदारी सामान्य जनतेने मार्गदर्शक सूचना पाळून करणे आवश्यक आहे. आज दुपारनंतर ग्रामपंचायतीने ध्वनिक्षेपकांवरुन काही प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. न बदलणाऱ्या मानसिकतेचे गंभीर परिणाम गाव परिसराला भोगायला लागण्याची भिती व्यक्त होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors of a corona patient in the Sangli area