पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपची उमेदवारी सांगलीच्या संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर

अजित झळके
Monday, 9 November 2020

सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पदवीधरसाठी तयारीला लागा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

सांगली : येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर या गोपुज (जि. सातारा) येथील साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पदवीधरसाठी तयारीला लागा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबर रोजी होत आहे. खूप कमी काळ हाती राहिला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यात भाजपने नाव जाहीर करून प्रचार यंत्रणेला वेग देण्यात आघाडी घेतली आहे. भाजपकडून शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, शौमिका महाडिक, माणिक पाटील-चुयेकर आदी नावांची चर्चा होती. त्यात संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली.

सांगली, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांशी देशमुख यांचा थेट कनेक्‍ट आहे. ते याआधी दीर्घकाळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. गेल्या विधानसभा निवडणुकाला त्यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातून मोठी तयारी केली होती, मात्र ऐनवेळी युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे संग्रामसिंह यांना सर्व तयारी असताना रिंगणाबाहेर थांबावे लागले. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत जावून तेथून उमेदवारी घेता का, अशी ऑफरही दिली होती. परंतू, देशमुख यांनी त्याला नकार देत भाजपसोबतच राहू, थोडी प्रतिक्षा करू, असे सांगितले होते. त्याचे फळ या उमेदवारीतून मिळाल्याचे सांगितले जाते.

 

संग्रामसिंह देशमुख यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दिवंगत संपतराव देशमुख हे 1995 च्या युती शासनाच्या काळात आमदार होते. त्यांनी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर वर्षभरात त्यांचे निधन झाले. त्या रिक्त जागेवर संग्रामसिंह यांना संधी मिळाली नाही, कारण त्यांचे वय लहान होते. त्यांचे चुलतबंधू पृथ्वीराज देशमुख पोटनिवडणुकीत आमदार झाले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपमध्ये आले. संग्रामसिंह यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढली, जिंकली आणि तीन वर्षे ते अध्यक्षही राहिले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत ते सलग पाच वर्षे उपाध्यक्षपदावर आहेत. गोपूज येथे त्यांनी स्वतःचा खासगी फुल्ल ऑटोमायजेशन असलेला साखर कारखाना उभा केला आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून कुणाचे आव्हान उभे राहील, याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
 

पुणे पदवीधर मतदार संघातून मला उमेदवारी देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी तरुण कार्यकर्त्यावर विश्‍वास दाखवला आहे. ही संधी नक्कीच मी यशस्वी करून दाखवेन. भाजपचे नेटवर्क, इथले काम मोठे आहे. त्यामुळे निवडणूकीत आम्ही बाजी मारू. चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश जावडेकर यांच्याप्रमाणे भविष्यात चांगले काम करून लक्षवेधी केलेल्या या मतदार संघातून मला लढण्याची संधी मिळते आहे, याचा आनंद मोठा आहे.

संग्रामसिंह देशमुख.

 

संपादन - अर्चना बनगे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangram Singh Deshmukh of Sangli announces BJP candidate from Pune graduate constituency